दरडसंकटाचे ८५ बळी! शेकडो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविले; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 04:58 AM2021-07-24T04:58:20+5:302021-07-24T04:59:44+5:30

ढगच फाटल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र भीषण महापुराचा सामना करीत असताना गुरुवारची रात्र काळरात्र ठरली.

85 victims of landslide and Hundreds of families move to safer places | दरडसंकटाचे ८५ बळी! शेकडो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविले; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक फटका

दरडसंकटाचे ८५ बळी! शेकडो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविले; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक फटका

googlenewsNext

- रायगडमध्ये तळीये गावात ४९ जणांचा मृत्यू

- पोलादपूरच्या केवनाळे, सुतारवाडीत ११ जणांचा बळी

- रत्नागिरीत १७ जण गाडले गेले

- साताऱ्यामध्ये दरडी कोसळून ८ जण मरण पावले

मुंबई : ढगच फाटल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र भीषण महापुराचा सामना करीत असताना गुरुवारची रात्र काळरात्र ठरली. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यावर दरडसंकट कोसळले आणि त्यात ८५ जणांचा बळी गेला. शुक्रवारची सकाळ होताच एकापाठोपाठ एक दरडी कोसळल्याच्या बातम्या येऊ लागल्या आणि समाजमन सुन्न झाले.

रायगड जिल्ह्यात महाडजवळ डोंगराच्या पायथ्याशी वसलेले तळीये गावच दरडीखाली दबल्याने ४९ जण मृत्युमुखी पडले. पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी अशा दोन ठिकाणी दरड कोसळून ११ जणांचा बळी गेला. रत्नागिरी जिल्ह्यात पोसरे बौद्धवाडी (ता. खेड) येथे दरड कोसळून १७ जण गाडले गेले. सातारा जिल्ह्यात सातारा, पाटण, वाई, जावली या तालुक्यात १० ठिकाणी दरडी कोसळल्याने ८ जण मृत्युमुखी पडले असून, अजून ३५ जण बेपत्ता आहेत.

- तळीये गावातील दरडीखाली दबलेले ३६ जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अद्यापही मोठ्या संख्येने लोक दरडीखाली अडकल्याची भीती आहे. त्यातच पोलादपूर येथील केवनाळे येथे चार घरांवर दरड कोसळली. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला, तर सुतारवाडी येथेही दरड पडल्याने पाच असा एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही गावांतील १३ जखमींना महाड आणि पोलादपूर येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

- एनडीआरएफ, एसडीआरएफ, नौदल, कोस्टगार्ड यांची प्रत्येकी दोन पथके तर स्थानिक पातळीवरील १२ बचाव पथके मदतकार्य करीत होती. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले तर नाही ना, याची खात्री करण्यासाठी शनिवारी पुन्हा एकदा बचाव कार्य हाती घेण्यात येणार आहे.

- खेड तालुक्यात धामणंदनजीकच्या पोसरे बौद्धवाडीत शुक्रवारी १२ घरांवर दरड कोसळली. ६ घरे पूर्णपणे दबली असून १७ जण त्याखाली गाडले गेले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. २५ जनावरेही गाडली गेली आहेत.

- सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण १० ठिकाणी दरडी कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला. ३५ जण बेपत्ता असून १०० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले. कोंडवळी व मोजेझोर या ठिकाणी ५ घरांवर दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला. २७ जणांना वाचविले आहे. पाटण तालुक्यातील आंबेघरमध्ये मोठी दरड कोसळून १० ते १२ घरे गाडली गेल्याची शक्यता आहे. या ठिकाणाहून ६० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मात्र, १५ लोक बेपत्ता आहेत. पाटण तालुक्यातीलच मिरगाव या ठिकाणीही ७ ते ८ घरांवर दरड पडून १२ लोक बेपत्ता आहेत. या ठिकाणी एनडीआरएफची टीम पाठविण्यात आली आहे. ढोकावळे गावातील ४ जण बेपत्ता आहेत. तर उंबर्डी येथेही दरड कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.

- मुंबई येथील गोवंडीतल्या शिवाजीनगर येथील तळमजला अधिक एक मजली बांधकाम कोसळले. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू, तर १४ जण जखमी झाले. नेहा परवेझ शेख (वय ३५), मोकार झुबीर शेख (८०), शमशाद शेख (४५) आणि फरिन शेख (२२) अशी मृतांची नावे आहेत. तर परवेझ शेख, अमिनबा शेख, अमोल धडेयी, समोल सिंग, फैजल कुरेशी, नम्रा कुरेशी, शाहीन कुरेशी हे जखमी आहेत. घाटकोपरच्या राजावडी रुग्णालयात चार तर तर सायन रुग्णालयात तीन जखमींवर उपचार सुरू आहेत. मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सात फायर इंजीन, एक रेस्क्यू व्हॅन, १०८ क्रमाकांच्या तीन रुग्णवाहिका, दोन जेसीबी, एक डम्परसह नऊ कामगार मदतीसाठी पाठविण्यात आले होते. शक्य होईल तेवढ्या वेगाने कोसळलेल्या घराचे ढिगारे बाजूला सारत जखमींना राजावाडी आणि सायन रुग्णालयात दाखल केले जात होते. दाटीवाटीच्या वस्तीत मदतकार्य करण्यास काही अडथळे येत असले तरी पहाटे सुरू झालेले मदतकार्य दुपारी उशिरापर्यंत सुरू होते.

- चिपळूणमध्ये पुराच्या पाण्यात वेढलेल्या दोन खासगी कोविड रुग्णालयांतील १० रुग्णांचा मृत्यू झाला असून, अन्य सहा नागरिकांचा बुडून मृत्यू झाला आहे. चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटल पुराच्या पाण्याने वेढले गेले होते. त्यात आठ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते; मात्र पाणी भरल्यानंतर वीजप्रवाह खंडित झाला आणि व्हेंटिलेटर यंत्रणा बंद पडली. त्यामुळे या आठही जणांचा मृत्यू झाला. अन्य एका कोविड रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मदतकार्य करणाऱ्यांना सहा मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत चिपळ‌ूणमधील बळींची संख्या १६ वर पोहोचली आहे.

मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

दरड कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षात आढावा घेतला. 

केंद्राकडूनही मदत : राज्यातील आपत्तीत मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे तर जखमींना ५० हजार रुपये दिले जातील, अशी घोषणा केली आहे.
 

Web Title: 85 victims of landslide and Hundreds of families move to safer places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.