अपंग कल्याणकारी योजनांसाठी ८.५० कोटी
By admin | Published: January 3, 2015 11:46 PM2015-01-03T23:46:57+5:302015-01-03T23:46:57+5:30
ठाणे महापालिकेने अपंग कल्याणकारी योजनेंतर्गत महापालिका हद्दीतील अपंगांसाठी १३ विविध प्रकारच्या योजनांसाठी साडेआठ कोटींची तरतूद केली आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेने अपंग कल्याणकारी योजनेंतर्गत महापालिका हद्दीतील अपंगांसाठी १३ विविध प्रकारच्या योजनांसाठी साडेआठ कोटींची तरतूद केली आहे. येत्या महिनाभरात यासंदर्भातील जाहिरात वृत्तपत्रांत प्रसिद्ध करून अपंगांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. परंतु, अद्यापही शहरात किती अपंग आहेत, याची आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नाही़ अपंगांचे सर्वेक्षण व्हावे, अशी मागणी होत असली तरी अद्यापही ते झालेले नाही. त्यामुळे या योजनेतील किती निधी खर्च होईल आणि किती अपंगांना याचा लाभ होणार, याबाबतही पालिका साशंक आहे.
विशेष म्हणजे, सर्टिफिकेटवाला खरा अपंग की, जो प्रत्यक्ष दिसतो तो अपंग, यामध्येही सध्या पालिका अडकली असून या योजनेचा लाभ खऱ्या अपंगांपर्यंत पोहोचणार का, याबाबत आतापासून शंका व्यक्त केली जात आहे.
ठाणे महापालिकेने तयार केलेल्या नव्या योजनेंतर्गत गतिमंद विद्यार्थ्यांच्या पालकांना अर्थसाहाय्य करण्याबरोबर त्यांचे प्रशिक्षण, औषधोपचार, मोफत उपचार, पारितोषिके देणे, अधिकाऱ्यांचे मानधन, वैद्यकीय खर्च, विशेष शाळेत मोफत प्रवेश देणे आदींसह इतर महत्त्वाच्या बाबींचा यात समावेश करून यासाठी ३ कोटी ५६ लाख ५० हजारांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नि:समर्थ (शारीरिक अपंग) असलेल्यांसाठीसुद्धा यामध्ये तरतूद आहे. त्यानुसार, व्यवसायासाठी कर्जपुरवठा उपलब्ध करून देणे, यात १०० टक्के अपंग असलेल्या व्यक्तीस फायदा मिळणार आहे. यामध्ये १०० लाभार्थी अपेक्षित धरण्यात आले असून यासाठी २५ लाख, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, वसतिगृह यासाठीसुद्धा २५ लाख यामध्ये १०० लाभार्थी, व्यवसाय सुरू करण्यासाठी, तांत्रिक व्यवस्थापनासाठी ९०० लाभार्थी अपेक्षित धरून यासाठी ४५ लाख, कृत्रिम अवयव, तीनचाकी व्हीलचेअर, टेपरेकॉर्डर यासाठी ५०० लाभार्थी अपेक्षित धरून यामध्ये ३० लाखांची तरतूद, योजना पुस्तिका, कार्यालय यासाठी ६ लाख, कुष्ठरुग्णांना अनुदान प्रतिमहा ४०० लाभार्थी अपेक्षित धरून त्यासाठी ७२ लाखांची तरतूद, परिवहनच्या दोन बसेस उपलब्ध करून देऊन त्यासाठी १ कोटी ४० लाख, गडकरी, डॉ. काशिनाथ घाणेकर येथे नाट्य कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये ५० टक्के सवलत देत ५ लाखांची तरतूद, वैद्यकीय अर्थसाहाय्य १०० लाभार्थ्यांसाठी ५ लाख, शासनाच्या विविध योजनांसाठी १० लाख, १०० टक्के अंध, १०० नि:समर्थांसाठी अनुदानात ५०० लाभार्थी अपेक्षित धरून यासाठी ९० लाख, आदींसह इतर योजनांसाठी असे मिळून सुमारे ८.५० कोटींची तरतूद केली आहे. दरम्यान, या योजनेसंदर्भातील प्रस्ताव समाजविकास विभागाला नुकताच प्राप्त झाला असून आता तो आयुक्तांकडूनदेखील मंजूर करून आला आहे. त्यानुसार, येत्या एक आठवड्यात याची प्रक्रिया सुरू होणार असून येत्या महिनाभरात या योजनांचा लाभ दिला जाईल, असे स्पष्ट केले.
मागील काही वर्षांत या योजनांसाठी केवळ दोन कोटींचाच निधी दिला जात होता. त्यानुसार, मागील वर्षी या योजनांचा केवळ १०० ते १२५ अपंगांनीच लाभ घेतल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु, आता हा निधी ८.५० कोटी झाला असला तरी अद्यापही शहरात अपंग किती आहेत, याची माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही. हे काम प्रभागस्तरावर असलेल्या आरोग्य केंद्रातून सुरू असते, अथवा जिल्हा शासकीय रुग्णालयात किती जणांनी प्रमाणपत्र प्राप्त केले, यावरून आकडेवारी स्पष्ट होऊ शकते. परंतु, सर्वेक्षण करणे सध्या तरी शक्य नसल्याचे पालिकेने सांगितले. त्यांच्याकडे ही माहिती असू शकते. त्यामुळे किती अपंगांना या योजनेचा लाभ होणार, याबाबत पालिका अनभिज्ञ आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून प्राप्त झालेले प्रमाणपत्रच ग्राह्यधरले जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. परंतु, प्रमाणपत्रधारक असलेली व्यक्ती आणि खरा अपंग यात फरक करता येणेदेखील काही वेळेस अशक्य होत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
अपंगांचे सर्वेक्षण करून नंतर निधीचे नियोजन करावे, असे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार, समाजविकास विभागाने या अपंगांचे सर्वेक्षण करावे, असे स्पष्ट झाले होते. परंतु, ही आरोग्य विभागाची जबाबदारी असल्याचे सांगून त्यांनी ही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, निधी तुम्ही खर्च करणार आणि सर्व्हे आम्ही का करायचा, असा प्रतिसवाल आरोग्य विभागाने उपस्थित करून यातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे अपंगांचे सर्वेक्षण रखडले आहे.