झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 08:43 AM2024-09-29T08:43:06+5:302024-09-29T08:43:30+5:30

शाश्वत शहरी विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट

8500 crore for slum rehabilitation scheme; Fund sanctioned by MMRDA | झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घाटकोपर (पूर्व) येथील माता रमाबाई आंबेडकरनगर आणि कामराजनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८ हजार ४९८ कोटींचा निधी एमएमआरडीएने मंजूर केला आहे. 

  हजारो झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करणे आणि शाश्वत शहरी विकासाला चालना देणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या प्राधिकरणाच्या १५८ व्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शासनाने  एसआरए आणि एमएमआरडीए, म्हाडा, सिडको यांसारख्या इतर संस्थांसोबत प्रकल्पांच्या संयुक्त अंमलबजावणीचे अधिकार दिले होते. रमाबाई आंबेडकरनगर आणि कामराजनगर येथील योजना एमएमआरडीए आणि एसआरए यांच्या संयुक्त भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.

हा प्रकल्प ४८ महिन्यांत राबविण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत पात्र झोपडपट्टीधारकांना मोफत घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बगीचे, आरोग्य केंद्रे आणि शैक्षणिक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. पूर्व मुक्त मार्गाचे विस्तारीकरणही योजनेमध्ये समाविष्ट आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

झोपडपट्टीधारकांचे जीवनमान उंचावणे आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. माता रमाबाई आंबेडकरनगर प्रकल्प शाश्वत शहरी विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 

हजारो झोपडपट्टीधारकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आधुनिक सर्वसमावेशक मुंबई आमच्या उद्दिष्टाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
- डॉ. संजय मुखर्जी, 
महानगर आयुक्त, एमएमआरडीए 

Web Title: 8500 crore for slum rehabilitation scheme; Fund sanctioned by MMRDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.