मुंबई – मुंबईतील रस्त्यांची कामे कधी होणार? मार्च आणि आता पुन्हा नवी डेडलाईन दिली आहे. एकाबाजूला बिल्डर, कंत्राटदारांचे सरकार ऐकतं. शहरातील बांधकामामुळे धुळीकरण होतंय त्यावर काही उपाय करत आहात का? अजून १५ वार्डात वार्ड ऑफिसर नाही. बदल्यांसाठी खोके मागितले जातायेत. साडे आठ हजार कोटींची रस्त्यांची कामे खोळंबली आहेत. डेडलाईन न पाळणाऱ्यांवर कारवाई केली का? हे घाणेरडे राजकारण राज्यात सुरू आहे अशा शब्दात माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, आमचे सरकार राज्यात आल्यानंतर या सरकारमधून ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले त्यांना जेलमध्ये टाकणारच. राज्यात प्रदुषित राजकारण करून ठेवलंय ते सुधारण्यासाठी आम्ही पुढे आलोय. खड्डेमुक्त रस्ते देऊ अशी घोषणा करणाऱ्यांनीच रस्त्यांची कामे का खोळंबली याचा खुलासा करावा. एमएसआरडीसी असो वा बीएमसी सगळीकडे गोंधळ सुरू आहे. बुलेट ट्रेन यायच्याआधी अनेक उद्योग गुजरातला गेले. हे सरकार कुठून चालतंय हा प्रश्न आहे. मी कंत्राटदारांची नावे घेतली नाहीत. ज्यांना काम दिले जाते ते काम करतात. सगळीकडे खोक्यांचा कारभार आहे. कागदपत्रे तयार आहेत पण रस्ते बांधकाम दिसत नाही. या रस्ते घोटाळ्यात जे कुणी दोषी असतील मंत्री असो, अधिकारी असो सगळ्यांवर कारवाई आम्ही करणार. जिथे जिथे भ्रष्ट राजकारण सुरू आहे तिथे जनता बदल करणार आहे. सरकार डरपोक आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत घटनाबाह्य सरकार रस्त्यात घोटाळा नाही असं बोलतायेत. दक्षिण मुंबईतील एका कंत्राटदाराला नोटीस दिली होती. त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. साडे आठ हजार कोटी रुपयांची कामे टेंडर दिली, कंत्राट दिली तरी सुरू झालेली नाहीत. हा घोटाळा आहे. जनतेची ताकद आणि माध्यमांमुळे भ्रष्टाचार काही प्रमाणात रोखू शकलो. मुंबई, महाराष्ट्राची लूट आम्ही खपवून घेणार नाही. भ्रष्ट सरकारचा जन्म खोक्यातून झाला आहे. जनता त्रस्त आहे. कृषी असो उद्योग असो, एमपीएससीमध्ये पोस्टिंगसाठी सरकार पैसे मागते. निवडणूक लावा, सरकार बदलेल. भ्रष्ट सरकार बसवून भाजपा आनंदी आहे का? ज्यांच्या ज्यांच्यावर भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप लावलेत ते आज त्यांच्यासोबत सरकारमध्ये बसले आहेत असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.
केवळ गद्दारांचा विकास झाला
मागील दीड वर्षात विकास झाला नाही. विकास केवळ ४० गद्दारांचा झाला. मुंबई, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, ठाण्याचा हा विषय आहे. ज्या ज्या शहरांमध्ये महापौर नाहीत, नगरसेवक नाही. तिथे जो काही घोटाळा सुरू आहे तो आम्ही लोकांसमोर आणला आहे. रस्त्यांमध्ये कोट्यवधीचा घोटाळा केला आहे. मुंबईतील रस्त्यांसाठी ५ कंत्राटदारांना कामे दिली. त्यातील एकाला टर्मिनेसनची नोटीस दिली आहे. पुढील आठवड्यात यावर सुनावणी होणार आहे. सुनावणीत तडजोड होणार की खरोखरच कारवाई होणार याकडे आमचे लक्ष असेल असंही आदित्य ठाकरेंनी सांगितले.
‘त्या’ कंत्राटदाराला दिलेल्या कामाचे पुढे काय?
मुंबईच्या पूर्व उपनगरात ज्या कंत्राटदाराला काम दिले त्याच कंत्राटदाराने चिपळूणमध्ये बांधलेला एक पूल अलीकडेच पडला. त्या पूलाची चौकशी काय झाली? त्या कंत्राटदारावर कारवाई होणार आहे का? मग तिथे कारवाई होणार असेल तर त्याला दिलेल्या मुंबईतील कामांचे काय हादेखील प्रश्न आहे. मुंबईत रस्त्याची १ ऑक्टोबर ते ३१ मे कालावधीत होतात. २०२१-२२ काळात जी रस्त्यांची कामे होणार होती. त्यातील एकातरी कामाची सुरुवात झालीय का? आज २०२४ उजाडेल तरी मुंबईत कामाला सुरुवात झाली नाही. अडीच हजार कोटींची कामे रखडली आहे. या २०२३ जानेवारीपासून साडेसहा हजार कोटींच्या कामांची जाहिरातबाजी करून घोषणा करण्यात आली. पण खोके सरकारने कंत्राटदारांचे लाड केले पण प्रत्यक्षात कामे कुठेच सुरू नाहीत असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.