मुंबई - सार्वत्रिक लोकसभा निवडणूक- २०१९ करिता मुंबई उपनगर जिल्ह्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत ५ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांत एकूण ८६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. यानुसार आता मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून १८, मुंबई उत्तर पश्चिम (वायव्य)लोकसभा मतदारसंघातून २१, मुंबई उत्तर पूर्व(ईशान्य) लोकसभा मतदारसंघातून २७ व मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून २० उमेदवार असणार आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सचिन कुर्वे यांनी आज दिली. मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने येत्या २९ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे सादर करण्यात दि.२ एप्रिल २०१९ रोजी प्रारंभ झाला होता, तर ९ एप्रिल २०१९ रोजी नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची मुदत संपुष्टात आली होती. दि. २ एप्रिल ते ९ एप्रिल २०१९ या कालावधी दरम्यान प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी ही दिनांक १० एप्रिल २०१९ रोजी करण्यात आली. या छाननीदरम्यान १३ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे अवैध, तर ९१ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली.नामनिर्देशन पत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे अर्ज १२ एप्रिल २०१९ पर्यन्त मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवसापर्यंत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून राकेश विश्वनाथ अरोरा यांनी माघार घेतली आहे. मुंबई उत्तर पश्चिम(वायव्य) लोकसभा मतदारसंघातून ज्योती सुरेश शेट्टी यांनी माघार घेतली आहे. मुंबई उत्तर पूर्व(ईशान्य) लोकसभा मतदारसंघातून राजेंद्र वामन वाघमारे यांनी माघार घेतली आहे. तर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून राकेश अरोरा वमुइनुद्दीन यार मोहम्मद खान या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. वरीलनुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातून एकूण ५ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९’ करिता ८६ उमेदवार असणार आहेत.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदार संघात ८६ उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 8:38 PM