Join us  

बालविवाहानंतर ८६ टक्के मुली शिक्षण प्रवाहाच्या बाहेर, ५९ टक्के मुलींची किशोरवयातच गर्भधारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 12:22 PM

Child Marriage : कोविडकाळात वाढलेल्या बालविवाहाच्या प्रमाणामुळे ८६ टक्के मुली शिक्षण प्रवाहाच्या बाहेर गेल्याची माहिती क्राय (चाईल्ड राईट्स अँड़ यू ) या सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

मुंबई : कोविडकाळात वाढलेल्या बालविवाहाच्या प्रमाणामुळे ८६ टक्के मुली शिक्षण प्रवाहाच्या बाहेर गेल्याची माहिती क्राय (चाईल्ड राईट्स अँड़ यू ) या सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. देशातील ५९ टक्के बालविवाह झालेल्या मुलींची किशोरवयातच गर्भधारणा झाल्याचीही माहिती पुढे आली आहे. 

५१ टक्के मुलींनी त्यांच्या दोन दोन मुलांमधील अंतरही खूप कमी असल्याचे नोंदविले आहे. या बालमातांनी कमी वजनाच्या बाळांना जन्म दिल्याची नोंद सर्वेक्षणात करण्यात आली आहे. १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान देशभरात बालसप्ताहाच्या निमित्ताने क्राय या सेवाभावी संस्थेने बालविवाहाचे सर्वेक्षण करून संख्यात्मक आणि गुणात्मक माहिती मांडून अहवाल प्रसिद्ध केला आहे.

सर्वेक्षणामध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा या ४ राज्यांतील ४० खेड्यांचा समावेश करण्यात आला. सर्वेक्षणादरम्यान १६ टक्के पालकांना आणि ३४ टक्के बालविवाहित मुला- मुलींना दुष्परिणामांची जाणीव असल्याचे मत नोंदविण्यात आले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ४ आणि ५ ची तुलना करता मागील ५ वर्षांत बालविवाहाच्या प्रमाणात घट दिसून आली. मात्र, आवश्यक त्या पातळीवर अद्यापही जागरूकता झालेली नाही.मुलींचा टक्का बालविवाहात जास्त असल्याने दर ५ पैकी ३ बालवधूंना गर्भधारणेचा अनुभव आल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.  

सर्वेक्षणातील राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर बालविवाहाची सर्वाधिक टक्केवारी आंध्र प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र, ओडिशा आणि उत्तर प्रदेशात आहे. शिवाय बालविवाहाच्या वेळी मुलींचे सरासरी वय उत्तर प्रदेशात १६.३ वर्षे, ओडिशामध्ये १६.५ वर्षे, आंध्र प्रदेशात १६.६ वर्षे, तर महाराष्ट्रात १७ वर्षे असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

मुलींचा शिक्षणातील प्रवेशाचा टक्का हा बालविवाह कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. अभ्यासाच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, शाळेत गेलेल्या ८६%  बालवधू लग्नानंतर शिक्षण प्रवाहातून बाहेर पडल्या. त्यामुळे मुलींना १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत शाळेत कायम ठेवणे हे बालविवाह रोखण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल ठरू शकणार आहे.- पूजा मारवाहा, मुख्य कार्यकारी अधिकारी, क्राय. 

 

टॅग्स :शिक्षणमहाराष्ट्र