लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वेच्यारेल्वे संरक्षण दलाच्या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत हरवलेल्या ८६१ बालकांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात रेल्वे संरक्षण दलाला यश आले आहे. रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये ५८९ मुले आणि २७२ मुलींचा समावेश आहे.
रेल्वे स्थानकामध्ये आढळलेली मुले काहीवेळेस कौटुंबिक भांडण किंवा चांगले जीवन जगण्याच्या उद्देशाने शहरांकडे आकर्षित होऊन घर सोडतात. कुटुंबीयांना न सांगता ती रेल्वेने मोठ्या शहरांकडे प्रवास करतात. परंतु त्यांना नेमके कुठे जावे हे माहिती नसल्याने ती रेल्वे स्थानकांमध्येच बसून राहतात. अशा मुलांना ओळखण्यासाठी रेल्वेच्या आरपीएफ जवानांना विशेष प्रशिक्षण दिले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे स्थानकामध्ये आढळलेल्या अशा मुलांशी आरपीएफ कर्मचारी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात. या मुलांकडून त्यांच्या पालकांबाबत विचारपूस करून त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. तसेच त्यांच्या पालकांसोबत भेट घडवून आणण्यासाठी मदत करत आसल्याचे त्यांनी सांगितले.