Join us

चार महिन्यांत हरवली 87 अल्पवयीन मुले ! मुंबईत १२ मुली आणि महिला झाल्या बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 11:01 AM

३६ मुलांचादेखील समावेश असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मुंबई : राज्यात गेल्या तीन महिन्यांत साडेपाच हजारांहून अधिक स्त्रिया बेपत्ता झाल्याचे नुकतेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी उघड करत याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२३ ते अद्याप मुंबईत जवळपास ९२ मुली व महिला गायब झाल्या. तर यात ३६ मुलांचादेखील समावेश असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

लेकरांची मायही गायब

गेल्या साडेचार महिन्यांत हरवलेल्या महिलांमध्ये जवळपास २९ महिलांचा समावेश आहे. या महिलांच्या गायब होण्यामागे घरातील वाद, नैराश्य किंवा अन्य काही कारणे आहेत. या सर्व कारणांमुळे त्या घरातून निघून जातात, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

पालकांचे असहकार्य !

बऱ्याचदा महिलांच्या बेपत्ता होण्यामागचे कारण कुटुंबीयांना माहीत असते. परंतु संबंधित महिला घरातून का निघून गेली, याचे कारण ते पोलिसांसमोर उघड करीत नाहीत. त्यामुळे अशा काही महिला मानवी तस्करांनाही बळी पडण्याची भीती असते.

जर एखाद्या मुलीला तिच्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करताना पालकांचा विरोध असेल तर ती प्रियकराकडे राहण्यासाठी आई-बापाचे घर सोडते. त्यात ती सज्ञान, म्हणजे १८ वर्षे पूर्ण झालेली असेल तर कायद्याने आमचे हात बांधले जातात. याउलट अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यास पोलिसात हरवल्याचा आणि नंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करतात.

प्रेम, सेक्स आणि लग्नातले कन्फ्युजन !

पौगंडावस्थेत प्रेम, सेक्स आणि लग्न या तिन्ही गोष्टी मुलांना सारख्याच वाटतात. मात्र, तरुण-तरुणींचे समुपदेशन करणे गरजेचे असून लैंगिक बदलावरही त्यांच्याशी चर्चा करा, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.

स्त्रिया घर सोडण्याची कारणे?

जात, समुदायाच्या बाहेरील व्यक्तीशी प्रेमसंबंध

घरी असलेले कठोर निर्बंध

आई-वडील वारल्यानंतर भाऊ आणि वहिनीकडून होणारा छळ

आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा