८७ वर्षे जुन्या स्थानकाचा होणार कायापालट
By admin | Published: May 21, 2017 03:10 AM2017-05-21T03:10:20+5:302017-05-21T03:10:20+5:30
पश्चिम रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांपैकी मुंबई सेंट्रल स्थानकाला विशेष स्थान आहे. स्थानकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवासी
- महेश चेमटे । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांपैकी मुंबई सेंट्रल स्थानकाला विशेष स्थान आहे. स्थानकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवासी संख्येमुळे, ८७ वर्षे जुन्या मुंबई सेंट्रल स्थानकाचा कायापालट होणार आहे. केंद्राकडून हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांतर्गत मुंबई सेंट्रल स्थानकाचा पुनर्विकास होणार आहे.
आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त असलेल्या स्वीस चॅलेंज पद्धतीने मुंबई सेंट्रल स्थानकाचा विकास होणार आहे. खासगी विकासकाच्या मदतीने स्थानकाचा पुनर्विकास होणार असून, ही जागा ४५ वर्षांच्या करारासाठी देण्यात येणार आहे.मुंबई सेंट्रल स्थानकात सद्यस्थितीत उपनगरीय लोकलसाठी ४ आणि लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेससाठी ५ असे एकूण ९ फलाट आहेत. स्थानकावरील एक्स्प्रेस प्रवाशांची संख्या १ लाख असून, एकूण ३ लाखांवर प्रवासी रोज प्रवास करतात. सीसीटीव्हीचे जाळे पूर्ण स्थानकात पसरले असून, त्याची देखरेख स्टेशन मॅनेजरच्या कार्यालयात होते. स्थानकांत पूर्व-पश्चिम मार्गाला जोडणारे १२ जिने आहेत. स्थानकांवर उच्च श्रेणीच्या विश्रामगृहासह महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र विश्रामगृह आहेत, शिवाय स्थानकात राजधानी, आॅगस्ट क्रांती एक्स्प्रेस अशा एक्स्प्रेससाठी बेस किचनची व्यवस्था आहे.
पुनर्विकासानंतर मिळणाऱ्या सुविधा
विमानतळाच्या धर्तीवर या स्थानकाचा विकास होणार असून, स्थानकात सरकते जिने बसवण्यात येणार आहे. शिवाय सेल्फ तिकीट सेवा, अत्याधुनिक रॅम्प, पदपथांना जोडणारे एलिव्हेटेड डेस्क या सुविधा पुरवल्या जाणार आहे. शिवाय स्थानकांच्या मोकळ््या जागेत बुकशॉप, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, प्रार्थना कक्ष, फूडमॉल उभारण्यात येणार आहे.
स्थानकाचा इतिहास : ब्रिटिश वास्तुविशारद क्लाउड बॅटलीने या स्थानकाचा आराखडा तयार केला होता. १८ डिसेंबर १९३० साली सुरुवात झालेल्या स्थानकाचे नाव न्यूयॉर्क शहरातील ग्रॅन्ड सेंट्रल टर्मिनसवरून बॉम्बे सेंट्रल ठेवण्यात आले होते. स्थानकाबाहेर दोन उद्याने असून, तेथे १९२८ साली तयार करण्यात आलेले ‘लिटिल रेड हॉर्स’ नावाचे ऐतिहासिक रेल्वे इंजिन स्थानकाचे महत्त्व विशद करते. १८२८ साली हे इंजिन मेसर्स केर स्टुअर्ट अँड कंपनीने तयार केले होते. देवगड बरिया नॅरोगेज मार्गावर चालवले जाणारे हे इंजिन देवगड-बरिया संस्थानच्या मालकीचे होते. कालांतराने हा मार्ग बीबीसीआयमध्ये विलीन झाला आणि त्यानंतर त्याचा समावेश पश्चिम रेल्वेमध्ये झाला. ६१ वर्षे सेवा बजावल्यानंतर या इंजिनला विश्रांती देण्यात आली.
सध्या स्थानकात असणाऱ्या सुविधा
प्रवाशांच्या सोयीसाठी १० एटीव्हीएम, २१ आरक्षण केंद्र, १५ तिकीट केंद्र, ४ बुक स्टॉल, १ वैद्यकीय आपत्कालीन सेवा, १ रेल्वे जनआहार आणि आयआरसीटीसी संचलित १८ खाद्य पदार्थांचे स्टॉल आहेत. स्थानकाबाहेर दिव्यांग वाहनतळासह व्हीआयपी आणि खासगी वाहनतळासाठी विशेष सोय आहे, शिवाय प्री-पेड टॅक्सी, काळी-पिवळी टॅक्सी वाहनतळ आहे.
स्वीस चॅलेंज म्हणजे काय?
विकासकामे पारदर्शक व्हावी, म्हणून अल्पावधीत ही स्वीस चॅलेंज पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. या पद्धतीतीलसाधारण तीन टप्पे.
- व्यक्ती अथवा संस्थेने संकल्पचित्र आणि निविदा सादर करणे
- या निविदा आॅनलाइन असून, त्या सार्वजनिक करण्यात येतात. या प्रस्तावांवर हरकती नोंदवून त्या दूर करणे प्रस्ताव सादरकर्त्यास बंधनकारक असते.
- विविध निकषांवर आधारित येणाऱ्या निविदांना गुण दिले जातात. त्यापैकी सर्वाधिक गुण मिळवलेल्या त्रुटी विरहित सरस निविदा मान्य करून, तेथे बांधकाम करण्याची परवानगी दिली जाते.