लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
कोरोनामुळे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाचे महत्त्व नव्याने अधोरेखित झाले आहे. त्यामुळे पारंपरिक अकरावी , बारावीला न जाता अनेक विद्यार्थ्यांचा कल यंदा पॉलिटेक्निक , आयटीआयसारख्या अभ्यासक्रमांना जास्त असल्याचे दिसून येत आहे.
आज ,१८ सप्टेंबर रोजी पॉलिटेक्निक प्रवेशासाठी पहिली यादी जाहीर होणार असून, यंदा राज्यातून पॉलिटेक्निक प्रवेशांसाठी ८७ हजार ०९८ अर्जाची नोंदणी झाली आहे. मागील वर्षी पॉलिटेक्निक प्रवेशांत १० टक्क्यांची वाढ दिसून आली होती, यंदाही प्रवेशांत वाढ होईल, असे मत तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक अभय वाघ यांनी दिले आहे.
पारंपरिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत पदविका अभ्यासक्रमांचा खर्च कमी असून, तो पूर्ण होण्यास वेळही कमी लागतो. पदविका अभ्यासक्रमांची गरज, रोजगार आणि विविध कंपन्यांमध्ये असलेली संधी अशा विविध बाबी ध्यानात घेऊन आता तंत्रशिक्षण संचालनालयाकडून विविध प्रयत्न केले असल्याची माहिती संचालक अभय वाघ यांनी दिली. कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी आणि संबंधित शिक्षणाचा पाया भक्कम होत असल्याने विद्यार्थ्यांना रोजगारक्षम होण्यास मदत मिळते, त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी पॉलिटेक्निकला पसंती देत असल्याची माहिती त्यांनी दिली.
-----
संगणक , इलेक्ट्रिकलकडे ओढा
गेल्या दीड वर्षात विविध क्षेत्रात ऑनलाइन, डिजिटलचे महत्त्व वाढले आहे. भविष्याचा वेध घेत अनेक विद्यार्थ्यांनी संगणक , इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशनसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला पसंती दर्शविली आहे. या पाठोपाठ मेकॅनिकल , सिव्हिलसारख्या अभ्यासक्रमांकडेही विद्यार्थ्यांचा कल आहेच. खासगीपेक्षाही शासकीय प्रवेशांकडे विद्यार्थ्यांचा ओघ अधिक दिसून येतो.
--------
म्हणून हवे पॉलिटेक्निक
आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने आधी अकरावी, बारावी आणि नंतर पदवी शिक्षण असा ५ वर्षांचा कालावधी शिक्षणासाठी फारच जास्त होतो, त्यापेक्षा पॉलिटेक्निक प्रवेशांतून लवकरात लवकर शिक्षण पूर्ण करून रोजगारक्षम होणे हे सध्याचे लक्ष्य आहे.
विनीत रहाटकर, विद्यार्थी.
......................................
पुढच्या काही वर्षांत कौशल्याभिमुख आणि स्वयंरोजगार देणारे शिक्षण उपयुक्त ठरणार आहे. २ वर्षाच्या पॉलिटेक्निकनंतर आणखी काही अभ्यासक्रम करता येणे शक्य आहे. अधिकाधिक तांत्रिक शिक्षण देणाऱ्या अभ्यासात संधी अधिक उपलब्ध असल्याने पॉलिटेक्निकचा पर्याय उत्तम वाटतो
ऋषिराज तावडे , विद्यार्थी
--------------
राज्याची पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अर्जाची स्थिती
विभाग - नोंदणी केलेले विद्यार्थी
अमरावती - ५२८९
औरंगाबाद - १२८४८
मुंबई- १६३२७
नागपूर- ७७१४
नाशिक - १६६९५
पुणे - २७८००
एकूण - ८७०९८
---------
मुंबई विभागाची जिल्हानिहाय स्थिती
पालघर - १७११
रायगड- २२१५
मुंबई- ५५०७
सिंधुदुर्ग - ९३६
रत्नागिरी - ११२८
ठाणे - ४८३१
एकूण - १६३२७
----