लॉकडाऊन काळात ८७५६ गुन्हे दाखल, २२ कोटी किंमतीचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 04:49 PM2020-06-23T16:49:05+5:302020-06-23T16:49:34+5:30
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
मुंबई : लॉकडाऊन काळात राज्यात अवैध मद्यविक्री, मद्यनिर्मितीचे एकूण 8 हजार 756 गुन्हे नोंदविण्यात आले असून 4 हजार 127 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 756 वाहने जप्त करण्यात आली असून 2 2 कोटी 22 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 20 जून रोजी राज्यात 63 गुन्हे नोंदविण्यात आले असून 29 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 11 लाख 95 हजार रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष दररोज 24 तास सुरू आहे. त्यावर तक्रार नोंदवण्याची सुविधा पुरवण्यात आली आहे. राज्यातील 3 कोरडे जिल्हे ( गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर वगळता ) उर्वरीत 33 जिल्हयांमध्ये सुरक्षा निकषांचे पालन करून किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती सुरू आहेत.
राज्यात 15 मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून परवानाधारक ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देत आहे. या सेवेचा लाभ राज्यात 20 लाख 50 हदार 23 वेळा ग्राहकांनी घेतला आहे. 21 जून रोजी सुमारे 66 हजार 570 ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. त्यापैकी मुंबई शहर व मुंबई उपनगर येथे सुमारे 38 हजार 988 ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. ऑनलाईन प्रणालीवर 1 एप्रिल ते 17 जून या कालावधीत 1 लाख 38 हजार 46 जणांनी मद्यसेवन परवाने मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी 1 लाख 32 हजार 706 व्यक्तींचे परवाने मंजूर करण्यात आलेले आहेत. उर्वरीत अर्जावर कार्यवाही चालू आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांंनी दिली.