राज्यात उष्माघाताचे ८८ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 06:24 AM2019-04-16T06:24:10+5:302019-04-16T06:24:17+5:30
उन्हाच्या झळा आता चांगल्याच जाणवू लागल्या असून, विदर्भात त्याची तीव्रता प्रचंड आहे.
मुंबई : उन्हाच्या झळा आता चांगल्याच जाणवू लागल्या असून, विदर्भात त्याची तीव्रता प्रचंड आहे. यामुळे नागरिकांना उष्माघाताच्या त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. परिणामी, मार्चपासून उष्माघाताचे राज्यात ८८ रुग्ण आढळले आहेत. यात नागपूरमध्ये ६७ एवढे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी औरंगाबाद आणि धुळे या जिल्ह्यांत प्रत्येकी एक असा दोघांचा मृत्यू झाला. मात्र, ते दोन्ही संशयित मृत्यू असल्याचे साथरोग विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यात १५ मार्चपासून अकोला विभाग १२, नागपूर विभाग ६७, लातूर विभाग ६, नाशिक विभागात १ आणि औरंगाबादमध्ये २ असे एकूण ८८ रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या तापमानामुळे अनेकांना जलशुष्कतेची, अर्थात डिहायड्रेशनची समस्या जाणवू लागली आहे. ही परिस्थिती आरोग्यासाठी घातक असून, उष्माघाताचा धोकाही नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता नागरिकांनी उन्हापासून स्वत:चा बचाव करावा, असे आवाहन साथरोग विभागाने केले आहे. याविषयी, आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, विशेषत: या दिवसांत शरीराचे तापमान नियंत्रणात राखण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. त्याशिवाय, कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
>अशी घ्या काळजी
वाढत्या उन्हात फार काळ कष्टाची कामे टाळावीत, कष्टाची कामे सकाळी, संध्याकाळी अथवा तापमान कमी असेल, तेव्हाच उरकावी. सैल व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरण्यास प्राधान्य द्यावे, जलसंजीवनीचा वापर करावा, भरपूर पाणी व लिंबू साखर पाणी प्यावे, घराबाहेर पडताना कान व डोळे पांढºया रुमालाने झाकून घ्यावे.
उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत, लहान मुलांना जास्त थंड पदार्थ देऊ नयेत, तेलकट मसालेदार पदार्थ खाणे टाळा, उन्हातून आल्याबरोबर थंड हवेत बसू नये, उपाशीपोटी घराबाहेर पडू नये, शीतपेयांचा अतिरेक टाळावा, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.