Join us

सूरज चव्हाणची ८८ लाखांची मालमत्ता जप्त; कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई

By मनोज गडनीस | Published: March 16, 2024 9:22 PM

जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये मुंबईतील फ्लॅट व रत्नागिरी जिल्ह्यातील भूखंडाचा समावेश आहे.

मुंबई - कोव्हिड काळात स्थलांतरितांना देण्यात आलेल्या खिचडी वाटपात घोटाळा झाल्याच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले  व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या सूरज चव्हाण याची ८८ लाख ५१ रुपयांची मालमत्ता ईडीने शनिवारी जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये मुंबईतील फ्लॅट व रत्नागिरी जिल्ह्यातील भूखंडाचा समावेश आहे.

कोव्हिड काळात मुंबई महानगरपालिकेतर्फे खिचडी वाटपाचे कंत्राट फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला प्राप्त झाले. हे काम संबंधित कंपनीला प्राप्त करून देण्यामध्ये सूरज चव्हाण यांचा मोठा वाटा होता व या कंपनीला हे कंत्राट मिळवून देताना निर्धारित निकषांचे उल्लंघन झाल्याचा देखील ठपका ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी सूरज चव्हाण यांना १ कोटी ३५ लाख रुपये मिळाल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. या खिचडी प्रकरणातील कंत्राटाच्या अटीनुसार १५ एप्रिल २०२० पासून संबंधित कंपनीने ३०० ग्रॅम वजनाचे खिचडीचे पाकीट वितरित करणे अपेक्षित होते. याकरिता प्रति पॅकेट ३३ रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. या प्रकरणात सूरज चव्हाण यांना मिळालेल्या पैशांतून त्यांनी फ्लॅट व भूखंडाची खरेदी केल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला असून त्यामुळेच ही जप्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस