मुंबई : कोरोनाकाळात परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी केंद्र सरकाने हाती घेतलेल्या वंदे भारत अभियानांतर्गत गुरुवारी एका दिवसात तब्बल ८८०१ जण मायदेशी परतले. केंद्रीय विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ही माहिती दिली.
भारतात आलेल्या प्रवाशांपैकी १०१९ प्रवासी मुंबईत दाखल झाले. यातील ४३३ थेट, तर ५८६ अन्य विमानतळावर थांबा घेऊन मुंबईत पोहोचले. थेट मुंबई विमानतळावर पोहोचलेल्या प्रवाशांमध्ये लंडनहून आलेल्या ८६, रियाध ५३, मस्कत १२१, तर न्यू यॉर्कहून आलेल्या १७३ जणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मस्कत–विजयवाडा मार्गे १२६, दुबई-पुणे-मुंबई १४७, बहरीन-कोची-मुंबई १६१ आणि कुवैत-विजयवाडा मार्गे १५२ प्रवासी मुंबईत दाखल झाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या देशांतून आलेल्या प्रवाशांना विलगीकरण सक्तीचे असून, सर्व प्रवाशांनी विमान प्रवास करण्यापूर्वी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल सादर करणे बंधनकारक आहे, असे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.