एकदा उघडल्यास चार तासच टिकताे : भारत बायोटेकची माहिती
स्नेहा मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोविशिल्डसह कोव्हॅक्सिन लसीकरणही सुरू असून गेल्या तीन दिवसांत राज्यात कोव्हॅक्सिनचे ८९ डोस वाया गेले आहेत. राज्यात शनिवारपासून सुरू झालेल्या या लसीकरण प्रक्रियेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
कोविशिल्ड लसीच्या पाच मिलीलीटर डोसमध्ये प्रत्येक डोस हा ०.५ मिलीलीटरचा असतो. यात १० डोस असतात. तर कोव्हॅक्सिनमध्ये २० डोस असतात. लसीकरणाच्या पहिल्या तीन दिवसांत म्हणजेच शनिवार १६ जानेवारी आणि १९, २० जानेवारीदरम्यान ८९ डोस वाया गेले. कोव्हॅक्सिन लसीचा डोस एकदा उघडल्यास केवळ चार तास टिकू शकतो, असे या लसीचे निर्माते भारत बायोटेकने कळविले आहे.
राज्यात सहा ठिकाणी कोव्हॅक्सिन लसीकरण प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत जे.जे. रुग्णालयात १३ डोस, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय २६, औरंगाबाद शासकीय रुग्णालय १६, सोलापूर शासकीय रुग्णालय १३, तर पुण्यात शासकीय रुग्णालयात १४ डोस वाया गेले आहेत. अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात सर्वांत कमी म्हणजेच सात डोस वाया गेले.
सहा केंद्रावरील माहितीनुसार, सुरुवातीच्या दिवसांतच डोस वाया जाऊ लागले आहेत. मात्र, दुसऱ्या दिवशी हे प्रमाण १२९ टक्क्यांनी वाढले. या सहा केंद्रांवर लाभार्थ्यांची नोंदणी कमी झाल्याने ३९ डोस वाया गेल्याचे समोर आले आहे. तिसऱ्या दिवशी ३३ डोस वाया गेल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली.
- असे झाले आतापर्यंतचे लसीकरण
* १६ जानेवारीला ६०० नोंदणी झालेल्यांपैकी ३८३ लाभार्थ्यांना लस.
* १९ जानेवारीला २५० पैकी १८१ लाभार्थ्यांना लस.
* २० जानेवारीला ३२७ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण. यात अमरावतीमध्ये ११५ लाभार्थ्यांना लस.
* प्रत्येक दिवशी लसीकरणासाठी १०० व्यक्तींचे लक्ष्य
.................................