मध्य आणि पश्चिमवर ८९२ डब्यांचे रूपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये होणार;लोअर परळ, माटुंगा वर्कशॉपमध्ये काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 01:58 AM2020-04-02T01:58:36+5:302020-04-02T06:27:15+5:30
प्रत्येक कोचमध्ये १० ते १६ कोरोनाग्रस्त रुग्णांना यातून उपचार मिळणार आहे. यासाठी २० डब्यांचे स्वरूप बदलले जात आहे.
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ८९२ डब्याचे रूपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचार देण्यासाठी ४८२ आयसोलेशन वॉर्ड तयार केले जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये आयसोलेशन डबे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
परळ वर्कशॉप, एलटीटी आणि वाडीबंदर येथील कोच केअरिंग सेंटरमध्येदेखील आयसोलेशन डबे तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. तसेच, पश्चिम रेल्वे मार्गावर ४१० डब्याचे रूपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये होणार आहे. हे काम लोअर परळ वर्कशॉपमध्ये सुरू आहे.कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य सेवेच्या प्रयत्नांना पूरक बनविण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्न करत आहे. रुग्णालयाच्या खाटांची व्यवस्था करणे, प्रवासी डब्यांचे विलगीकरण करून आयसोलेशन डबे तयार केले जात आहेत.
प्रत्येक कोचमध्ये १० ते १६ कोरोनाग्रस्त रुग्णांना यातून उपचार मिळणार आहे. यासाठी २० डब्यांचे स्वरूप बदलले जात आहे. प्रत्येक डब्यात शेवटच्या पार्टिशनमधून दरवाजा काढण्यात आला आहे. प्रत्येक डब्याच्या शेवटी एक इंडियन स्टाइल टॉयलेटचे रूपांतर बाथरूममध्ये करण्यात आले आहे. टॉयलेटमध्ये बादली, मग आणि साबण प्लेट ठेवली आहे. यासह डब्याचा मधला बर्थ, शिडी काढण्यात येणार आहे.
दोन हजार मास्क २३५ लिटर हॅण्ड सॅनिटायझर
परळ वर्कशॉपमध्ये ४५० नग मास्क शिवण्यात आले आहेत. १४० लीटर हॅण्ड सॅनिटायझर तयार केले गेले आहे. माटुंगा वर्कशॉपमध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी २०० स्क्रब अॅप्रोनची व्यवस्था केली आहे. हे अॅप्रोन भायखळा येथील रेल्वे रुग्णालयाकडे देण्यात आले आहेत. रेल्वे रुग्णालयातील रुग्णांसाठी १० स्ट्रेचर तयार केले गेले आहेत. २ हजार ८० नग मास्क अद्यापपर्यंत शिवण्यात आले आहेत. २३५ लीटर हॅण्ड सॅनिटायझर तयार करण्यात आले आहेत.