९१ टक्के खड्डे बुजवले, मुंबई महापालिकेचा उच्च न्यायालयात दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 03:28 AM2018-08-02T03:28:06+5:302018-08-02T03:28:17+5:30
शहरातील खड्ड्यांसंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींपैकी ९१.१७ टक्के तक्रारींची दखल घेऊन खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने बुधवारी उच्च न्यायालयाला दिली.
मुंबई : शहरातील खड्ड्यांसंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींपैकी ९१.१७ टक्के तक्रारींची दखल घेऊन खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने बुधवारी उच्च न्यायालयाला दिली.
१० जून ते ३० जुलैपर्यंत पालिकेकडे खड्ड्यांसदर्भात १,६४२ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी १,४९७ तक्रारींची दखल घेऊन खड्डे बुजवण्यात आले आहेत. उर्वरित १४५ तक्रारींचीही लवकरच दखल घेतली जाईल, अशी माहिती मुंबई पालिकेच्या वकिलांनी न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाला दिली.
राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीत मुंबई पालिकेने वरील माहिती न्यायालयाला दिली. महापालिकेचे संकेतस्थळ, व्हॉट्सअॅप आणि महापालिकेच्या अॅपवरून या तक्रारी करण्यात आल्या. गेल्या सुनावणीत न्यायालयाने याबाबत राज्य सरकाकरडूनही उत्तर मागितले होते. मात्र, राज्य सरकारने त्यासाठी मुदत मागितली आहे.