Join us

९१ शाळांचा विद्यार्थ्यांना ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 2:31 AM

दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळांनी विद्यार्थ्यांना ठेंगा दाखवल्याने दुसºया फेरीआधीच आरटीई प्रवेशाचे बारा वाजल्याचे दिसून येत आहे.

सीमा महांगडे ।मुंबई : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या २५ टक्के राखीव प्रवेशाची पहिली फेरी पार पडली आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळांनी विद्यार्थ्यांना ठेंगा दाखवल्याने दुसºया फेरीआधीच आरटीई प्रवेशाचे बारा वाजल्याचे दिसून येत आहे. मुंबईत महापालिका शिक्षण विभाग व शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्या अखत्यारीतील एकूण ३५२ शाळा आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरतात. यातील तब्बल ९१ शाळांनी पहिल्या प्रवेश फेरीत प्रवेश न दिल्याने आरटीईचे पहिल्या फेरीतील ५७१ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. यामुळे या शाळांनी थेट शिक्षण हक्क कायद्यालाच हरताळ फासला आहे.पालिका शिक्षण विभाग आणि उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीतील या ९१ शाळांत आरटीईच्या तब्बल १८३२ जागा आहेत. त्यातील पहिल्या सोडतीत एकूण अर्जांपैकी ५७१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली, मात्र या शाळांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एकालाही प्रवेश दिलेला नाही. त्यांच्यासमोर पेंडिंग असा शेरा मारून ठेवलेला आहे.शाळांना उपसंचालक कार्यालयांकडून प्रतिपूर्ती करण्यात येऊनही आरटीई प्रवेशासाठी शाळांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे नियमांना बगल देत नामांकित शाळा आरटीई कायद्यालाच हरताळ फासत असल्याचा आरोप आरटीई कार्यकर्त्यांनी केला आहे.आरटीई प्रवेशानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारकडून दिले जाते. या शुल्काची प्रतिपूर्ती न झाल्यामुळे खासगी शाळांनी प्रवेश देणे बंद केले होते.या ९१ शाळांमध्ये राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांसोबत आयसीएसई, सीबीएसई, आयजीसीएसई बोर्डांच्या शाळांचाही समावेश आहे. पालिका शिक्षण विभाग आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे यांच्यावर नियंत्रण नसल्याने शिक्षण विभागच अकार्यक्षम असल्याचा आरोप अनुदानित शिक्षण बचाव समितीचे सुधीर परांजपे यांनी केला आहे.दुसऱ्या लॉटरीबाबतही संभ्रमएकीकडे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत शाळांची मनमानी सुरू असताना कारणे देऊन शाळा प्रवेश नाकारत आहेत. त्यामुळेच पहिल्या फेरीतील प्रवेशच अद्याप पूर्ण झालेले नसल्याने १८ एप्रिल रोजी अपेक्षित असणारी दुसरी यादी पालिका शिक्षणाधिकाºयाकडून अद्याप जाहीरच करण्यात आलेली नाही. यासाठी अजून ३ ते ४ दिवस लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.