मुंबई : मुलांचे आरोग्य उत्तम राहावे, एकाग्रता वाढावी यासाठीच मुंबई महापालिकेच्या ११ शाळांमध्ये योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. योग वर्गांमध्ये ९६३ विद्यार्थ्यांनी योगाचे धडे गिरवले. लहान वयातच मुलांनी योगसाधना सुरू केल्यास मन-शरीर-आत्मा या त्रिकूटाचा उत्तम समतोल साधता येतो. शरीरातील ऊर्जास्रोतांचा प्रवाह वाढून शारीरिक तंदुरुस्ती सुधारणे आणि त्या मार्गाने व्याधींना दूर ठेवणे शक्य होते, असे मत या वेळी शिक्षकांनी मांडले. ‘कैवल्यधाम योगा इन्स्टिट्यूट’ने हे प्रशिक्षण वर्ग घेतले. कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांनी सांगितले, ‘योग एका मार्गदर्शक मध्यस्थासारखा असतो. त्यामुळे मुलांमध्ये स्वाभाविकच समाविष्ट असलेले अनेक गुण प्रकर्षाने उजळून निघतात. शारीरिक लाभाच्या व्यतिरिक्त मुलांना जागरूक आणि एकाग्र बनविण्यासाठीदेखील याचा मोठा फायदा होतो. मुंबई महापालिकेच्या शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना योग शिकविण्याचे ठरविले, याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो.’ (प्रतिनिधी)या शाळांत दिले योगाचे प्रशिक्षणकुलाबा माध्यमिक, ना. म. जोशी मार्ग माध्यमिक, भायखळा (पूर्व) माध्यमिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वरळी, गोशाला माध्यमिक मुलुंड, संत कक्कया मार्ग धारावी, मरोळ प्राथमिक अंधेरी, विलेपार्ले सन्यास आश्रम, के.डी. गायकवाड प्रथमिक, सायन कोळीवाडा, कवळे मठ, बाणगंगा आणि जी. के. माध्यमिक प्रशाला लोअर परळ.
महापालिकेच्या ९६३ विद्यार्थ्यांनी गिरवले योगविद्येचे धडे
By admin | Published: February 11, 2016 2:41 AM