९७० घरांसाठी म्हाडाची सोडत
By admin | Published: June 2, 2016 02:23 AM2016-06-02T02:23:49+5:302016-06-02T02:23:49+5:30
गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढल्यानंतर, म्हाडा प्राधिकरण आता सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची सोडत काढण्यासाठी सज्ज झाले आहे
मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढल्यानंतर, म्हाडा प्राधिकरण आता सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची सोडत काढण्यासाठी सज्ज झाले आहे. ९७० परवडणाऱ्या घरांकरिता सोडत काढण्यासाठीची जाहिरातही येत्या दोन दिवसांत प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी बुधवारी दिली.
म्हाडा प्राधिकरणाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश मेहता बोलत होते. प्रत्यक्षात ३१ मे रोजी सर्वसामान्यांसाठीच्या परवडणाऱ्या घरांची सोडत काढण्यात येणार होती. मात्र, गिरणी कामगारांच्या सोडतीच्या प्रक्रियेमुळे सर्वसामान्यांच्या घरांच्या सोडतीला विलंब झाला, असे स्पष्टीकरण प्राधिकरणाने दिले होते. यावर मेहता यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता ते म्हणाले, ‘घरांच्या सोडतीसाठीच्या ‘सॉफ्टवेअर अपग्रेडशन’चे काम सुरू होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरांच्या सोडतीसाठी विलंब झाला. मात्र, आता हे काम अंतिम टप्प्यात आहे. सर्वसामान्यांच्या सोडतीसाठी घरांची संख्या ९७० एवढी आहे. या सोडतीच्या घरांसंदर्भातील जाहिरात दोन दिवसांतच प्रसिद्ध केली जाईल आणि सहा ते सात दिवसांत याबाबतच्या कार्यवाहीला वेग येईल.’
सोडतीसाठी असणाऱ्या घरांच्या दराबाबत मेहता यांना विचारले असता, त्यांनी दरांबाबत अनिश्चितता असल्याचे सांगितले. शिवाय अत्यल्प, अल्प, मध्य आणि उच्च या उत्पन्न गटासाठीच्या मर्यादेबाबतही मेहता यांना विचारले असता, त्यांनी हे सर्व मुद्दे बैठकीत निकाली काढण्यात येईल, असे म्हणत प्रश्नांना बगल दिली. (प्रतिनिधी)