२०१९ देखील उष्ण वर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 05:49 AM2020-01-07T05:49:39+5:302020-01-07T05:49:45+5:30
कार्बन डायऑक्साइड आणि अन्य ग्रीनहाउस वायुंमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे.
मुंबई : कार्बन डायऑक्साइड आणि अन्य ग्रीनहाउस वायुंमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. त्याचप्रमाणे, हवामानातील बदलांमुळेही प्रादेशिक स्तरावर तापमानात बदल होतात. अशाच काहीशा हवामान बदलामुळे २०१९ देखील सातवे उष्ण वर्ष ठरल्याची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने सोमवारी दिली.
तापमानवाढीची सर्वाधिक नोंद अंटार्क्टिक प्रदेशात होत आहे. या प्रदेशात बर्फाचे वितळणे वर्षभर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले. त्याचबरोबर, अंटार्क्टिक प्रदेशातील बर्फाचा थर कमी होत गेल्याचेही आढळून आले आहे. जगाच्या अनेक भागांत या वर्षात उष्णतेची लाट, पूर, अतिवृष्टी, दुष्काळ अशा परस्परविरोधी घटना अनुभवायला मिळाल्या. भारतातसुद्धा या वर्षी उत्तर भारतासह दक्षिण भारतातदेखील महापूर आला आहे. तापमान वाढीने तर कहर केला.
२०१९ साली सर्वसाधारण तापमानाच्या तुलनेत अधिक तापमान नोंदविण्यात आले. १९०१ सालापासून ही नोंद घेण्यात येत आहे. यापूर्वी २०१६ साल हे देशात उष्ण म्हणून नोंदविण्यात आले होते. तापमानवाढीची ही नोंद +०.३६ एवढी असून, महापूर, चक्रीवादळे हे त्याचे परिणाम आहेत. भारतीय समुद्रात या वर्षी ८ चक्रीवादळे आली असून, देशात या वर्षी ११० टक्के एवढा पाऊस नोंदविण्यात आला आहे.
>२०१८
१९५१ ते १९८० या ३० वर्षांतील तापमानाची सरासरी काढल्यास, त्यापेक्षा २०१८ मध्ये पृथ्वीचे तापमान नासाच्या मते ०.८३ अंस सेल्सिअसने अधिक नोंदविले गेले.
तीन वर्षे
२०१५, २०१६ व २०१७ या तीन वर्षांपेक्षा २०१८चे तापमान किंचित कमी असले, तरी गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतल्यास २०१८ हे सर्वात तप्त वर्ष ठरले.
१ अंश वाढ
१८८० पासून जागतिक सरासरी तापमानात एक अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.