दिंडोशी पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगाव पूर्व परिसरात दोन गटांच्या वादात आरिफ नामक तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर दिंडोशी पोलिसांनी रविवारी एकूण नऊजणांना अटक केली आहे. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गोरेगावच्या रत्नागिरी हॉटेल परिसरात हा प्रकार घडला होता. यातील मयत तरुण आरिफ आणि त्याचा मित्र अरमान खान (२९) यांचे अटक केलेला आरोपी अविनाश पवार व त्याच्या आठ साथीदारांमध्ये बऱ्याच वर्षांपासून वाद सुरू होते. पवार याच्या साथीदाराच्या चेहऱ्यावर मयत आरिफ याने चाकूने वार केला होता. काही दिवसांपूर्वीदेखील त्यांच्यात खटके उडाले होते. त्याच रागात त्यांनी शनिवारी आरिफवर जीवघेणा हल्ला केला.
त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी त्याचा मृत्यू झाला. त्यानुसार पवार आणि त्याच्या आठ साथीदारांना अटक करण्यात आल्याचे दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरणेंद्र कांबळे यांनी सांगितले. या आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.