पंतप्रधान, उपराष्ट्रपती यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात अर्भकांच्या मृत्यूची भीषण दुर्घटना ताजी असतानाच, गुरुवारी मध्यरात्री भांडूप येथील ड्रीम्स मॉलमध्ये कोरोना उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीत ९ रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला, तर पाच रुग्ण गंभीर जखमी आहेत. शिवाय दोन मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. या मृत्यूची गंभीर दखल घेतली असून, मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत त्यांनी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
या रुग्णालयात ७८ रुग्ण उपचार घेत होते. ६७ रुग्णांची सुखरुप सुटका करण्यात आली. धूरामुळे श्वास गुदमरून ९ रुग्णांचा मृत्यू ओढवला. याच रुग्णालयात उपचारादरम्यान दोन कोविड बाधितांचा मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह शवागारात होते. तेही या आगीत होरपळले. त्यांची नावे सांगण्यास पालिकेने असमर्थता व्यक्त केली आहे.
भांडूप पश्चिमेकडे असलेल्या तीन मजली ड्रीम्स मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सनराईज या रुग्णालयास गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता आग लागली. आग पूर्णपणे शमविण्यात शुक्रवार रात्री अग्निशमन दलाला यश आले. एकूण ११ मृतदेह अग्निशमन दलाने बाहेर काढले. त्यात निसार जावेद चंद ( ७४), रवींद्र मुणगेकर ( ६६ ), गोविंदलाल दास (८०), मंजुळा बाथेरिया (६५), अंबांजी नारायण पाटील (६५), सुनंदाबाई अंबांजी पाटील (५८), सुधीर सखाराम लाड (६६), हरिश करमचंद सचदेव (६८), श्याम भक्तिलाल (७७), महादेव शंकर अय्यर (७९), अशोक श्रीपद वाघमारे (३८) यांचा समावेश आहे. तर पाच जण जखमी झाले.
हॉस्पिटलमधील इतर ३० रुग्णांना मुलुंड जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर, भांडूप फोर्टिसमध्ये ४, ठाणे येथील विराज रुग्णालयात दोन, बीकेसी टप्पा १ मध्ये एक, गोदरेज रुग्णालयात एक, टँकरोड येथील सारथी रुग्णालयात एक, अग्रवाल रुग्णालयात पाच रुग्णांना हलविण्यात आले. दोन जणांना घरी सोडण्यात आले.
अग्निशमन दलाची शर्थ
अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरुवातीला तीन फायर इंजिन आणि दोन जंबो टँकर यांच्या मदतीने आग विझवण्याचे काम सुरू केले. शुक्रवारी पहाटे आगीने पुन्हा जोर पकडला. मॉलमधील १०० ते २०० मीटर परिसरातील दुकानांना आग लागून इलेक्ट्रिक साहित्य, लाकडाचे फर्निचर, इलेक्ट्रिक वायरिंग आणि रुग्णालयातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले. आग विझविण्याचे काम सुरू असतानाच मॉलच्या तिन्ही मजल्यांवर मोठ्या प्रमाणावर धूर पसरला. आग विझवण्यासाठी रोबो २०, मोटार पंप, १५ जंबो टँकर, ३ वॉटर टँकर इत्यादींसह इतर अत्याधुनिक साहित्याची मदत घेण्यात आली. आगी सोबतच धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर उठल्याने आग विझविण्यात अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
७१ जणांना सुखरूप काढले
मॉलच्या गच्चीवर काही लोक अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. गच्चीवरील लोकांना सुरक्षित बाहेर काढत असतानाच रुग्णालयातील रुग्णांना अत्यंत सुरक्षित बाहेर काढण्याचे माेठे आव्हान अग्निशमन दलासमोर होते. अग्निशमन दलाच्या मोठ्या शिडीच्या मदतीने येथे अडकलेल्या सुमारे ७१ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यामध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा आणि रुग्णांचा समावेश आहे.
कठोर कारवाई होईल...
राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरू आहेत, त्या ठिकाणच्या अग्निसुरक्षेची तपासणी तत्काळ करण्याचे निर्देश दिले आहेत. ही घटना दुर्दैवी आहे. यासंदर्भात ज्यांनी दुर्लक्ष व दिरंगाई केली अशा सर्व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
.....
रुग्णालयाचा निष्काळजीपणा?
प्राथमिक चौकशीत रुग्णालयाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. याबाबत सखोल तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल
- हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त, मुंबई
....
मॉलमध्ये कोविड रुग्णालय का?
मॉलमध्ये कोविड रुग्णालय असणे ही गंभीर बाब असून, याबाबत सर्वंकष चौकशीचे आदेश दिले आहेत. सनराईज रुग्णालयाला २८ फेब्रुवारी २०२१ला बंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, ३१ मार्च २०२१पर्यंत रुग्णालय बंद करू, असे रुग्णालय व्यवस्थापनाने महापालिका प्रशासनाला सांगितले होते. त्यानंतर कोविडची रुग्णसंख्या वाढल्याने हे रुग्णालय पुन्हा सुरू झाले होते.
- किशोरी पेडणेकर, महापौर