Join us

राज्याला कोविशिल्ड लसीचा ९ लाखांचा नवीन साठा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात एप्रिलपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी कोविशिल्ड लसीचा ९.०६ लाख डाेसचा नवीन साठा उपलब्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात एप्रिलपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी कोविशिल्ड लसीचा ९.०६ लाख डाेसचा नवीन साठा उपलब्ध झाला आहे. लवकरच राज्याला कोव्हॅक्सिनचा साठाही मिळणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले की, राज्याला काेविशिल्डचे ९.०६ लाख डोस उपलब्ध झाले असून, ते राज्यातील विविध जिल्ह्यांना वितरित करण्यात येत आहेत. पुण्याला १.१८ लाख डोस उपलब्ध झाले असून, सोलापूर आणि साताऱ्याला अनुक्रमे ३५ हजार आणि १८ हजार लसीचे डोस देण्यात आले. पुण्यात काही दिवसांपूर्वी कोविशिल्ड लसीच्या तुटवड्यामुळे केवळ कोव्हॅक्सिन लस देण्यात येत हाेती; पण आता साठा उपलब्ध झाल्याने सध्या पुण्यात लाभार्थ्यांना दोन्ही लस देण्यात येत आहेत. उपलब्ध झालेला लसीचा साठा हा नव्या लसीकरण मोहिमेसह फ्रंटलाइन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी वापरण्यात येईल.

आतापर्यंत केंद्राने राज्यात २०९ लसीकरण केंद्रांना संमती दिली आहे; पण लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी लसीकरण केंद्रे वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी ३६७ खासगी आणि सरकारी लसीकरण केंद्रांना परवानगी द्यावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. दरम्यान, कोविन ॲपमध्ये बदल करण्याची राज्याची मागणी केंद्र सरकारने मान्य केली असून, त्यानुसार जिल्हा आणि तालुका पातळीवर लसीकरण केंद्र- उपकेंद्रही यात समाविष्ट करण्यात येतील, असे पाटील यांनी सांगितले.

...........................