मुंबई: गुजरातमधील बांधकाम मटेरियल सप्लायरचा जवळपास ९ लाखांचा ऐवज सांताक्रुझच्या डोमेस्टिक एअरपोर्ट जवळील हॉटेल ताजमधून लंपास करण्यात आला. याप्रकरणी त्यांनी एअरपोर्ट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असून त्यांच्या मित्रावरच संशय व्यक्त केला जात आहे.
तक्रारदार मुलराजसिंग झाला (४२) हे त्यांचे मित्र दुष्यंतसिंग जडेजा (४०) , चिराग मेहता (५२), पराक्रमसिंग जाडेजा (२८) आणि किशोरसिंग परमार (४५) या मित्रसोबत कारने मुंबई फिरायला आले होते. हे सर्व १ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता हॉटेल ताजला पोहोचले आणि त्यांनी तिथे खोली क्रमांक ६३२ व ६२९ बुक केली. झाला आणि त्यांचे मित्र दुष्यंतसिंग हे ६३२ क्रमांकाच्या खोलीत राहायला गेले. त्यांनी फ्रेश होऊन दागिने व रोख रक्कम ही बेडवरील ड्रॉवरमध्ये ठेवली. त्यावेळी त्यांना मिरा रोडला राहणारा मित्र संजय सोनेचा (५०) याचा फोन आला. हे मुंबईला आल्याचे समजल्यावर रात्री २ च्या सुमारास तो त्यांना भेटायला आला. त्यांनी काही वेळ गप्पा मारल्यावर झाला आणि दुष्यंतसिंग हे दमल्याने झोपी गेले. तर सोनेचा हा दारू पीत बसला होता.
मात्र सकाळी १० वाजता झाला उठले मात्र सोनेचा तिथे नव्हता. झाला हे बाहेर निघण्यासाठी तयार होत असताना त्यांनी ड्रॉवर उघडला मात्र त्यातील दागिने गायब होते. ते घरात कुठेच न सापडल्याने अखेर त्यांनी सोनेचा याला फोन केला मात्र तो बंद होता. झाला याचे महागडे जॅकेट व त्यातील पॅनकार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स देखील मिळत नव्हते. झाला यांनी हॉटेल स्टाफला चोरी झाल्याचे कळवले. तेव्हा हॉटेल व्यवस्थापक तिथे आले व त्यांनी तिथले सीसीटिव्ही कॅमेरे तपासले. ज्यात सोनचा हा झाला यांचे जॅकेट घालून बाहेर पडल्याचे दिसले. त्यानुसार जवळपास ९ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असुन याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला आहे.