Join us

मुलाला नोकरी देतो सांगून ९ लाखांचा गंडा; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची फसवणूक, माजी ओएसडीचा प्रताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 09:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलाला आरोग्य खात्यात नोकरी देतो सांगून शिंदेसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांचा माजी ओएसडी सचिन ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलाला आरोग्य खात्यात नोकरी देतो सांगून शिंदेसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांचा माजी ओएसडी सचिन चिखलीकरने एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला साथीदारांच्या मदतीने नऊ लाखांना गंडवले आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 

रत्नागिरीला राहणाऱ्या विशाखा विजय बनप (६०) यांचे पती २०१९ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाले. बीएपर्यंत शिकलेल्या मुलासाठी ते नोकरी शोधत असताना २०२१ मध्ये त्यांची चिखलीकरशी ओळख झाली. चिखलीकर  मंत्रालयात ओएसडी आहेत आणि ते पैसे घेऊन नोकरी लावतात, अशी माहिती त्यांना मिळाली.

फेब्रुवारी २०२१ मध्ये चिखलीकर गोऱ्हे यांच्यासह जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला रत्नागिरीला गेले होते. त्यावेळी बनप यांनी त्यांची भेट घेऊन मुलाच्या नोकरीबाबत सांगितले. त्यांच्याकडे चिखलीकरने नोकरीसाठी दोन लाखांची मागणी केली. त्यानुसार, बनप यांनी त्याला दोन लाखांचे दोन धनादेश दिले. त्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये त्याने चारुदत्त तांबेशी त्यांची ओळख करून दिली. आरोग्य खात्याची परीक्षा रद्द झाल्याचे समजताच बनप यांनी चिखलीकरकडे पैसे परत मागितले. तेव्हा, त्याने ते पैसे तांबेला दिल्याचे सांगून त्याला भेटण्यास सांगितले.

बनप यांनी तांबेकडे पाठपुरावा केला. त्याने सेंट्रल रेल्वेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आश्वासन त्यांना दिले; परंतु काहीच हालचाल केली नाही. अखेर, सेंट्रल रेल्वेची लिपिक भरती प्रकिया पेपरफुटीमुळे रद्द झाली आहे आणि काम करणारा रेल्वेचा अधिकारी घोसला याला पोलिसांनी अटक केली आहे, असे तांबेने बनप यांना सांगितले आणि पुन्हा तुमच्या मुलाला कृषी खात्यात लिपिक म्हणून नोकरी लावतो, असे आश्वासन दिले. वरून १४ लाखांची मागणी केली. त्यानुसार सप्टेंबर २०२३ मध्ये मुलाने लिपिक पदाची परीक्षा दिली. त्यामुळे बनप यांचा तांबेवर विश्वास बसला. 

निकाल लागला, पण...तांबेने बनप यांची सिद्धार्थ गायकवाडशी भेट करून दिली. गायकवाडने आणखी दोन लाखांची मागणी केली. बनप यांनी हेही पैसे दिले. गेल्या वर्षी फेब्रुवारीत कृषीतील लिपिक परीक्षेचा निकाल लागला. त्यात आपल्या मुलाचे नाव नसल्याचे बनप यांना कळल्यावर  फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

... म्हणून पदावरून हटवलेचिखलीकरच्या विरोधात अशा स्वरूपाच्या तक्रारीनंतर त्याला ओएसडी पदावरून हटविण्यात आले होते. त्याने अशाच प्रकारे अनेकांना गंडविल्याचा संशय आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :नोकरी