मुंबई- राज्यात ३९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. मंगळवारी १८ जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्याने एकूण मंत्र्यांची संख्या २० झाली आहे. मात्र दोन्ही बाजूंच्या दिग्गजांच्या पदरी तूर्त निराशाच पडल्याचं दिसून येत आहे.
डॉ. संजय कुटे, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, संभाजी निलंगेकर, माधुरी मिसाळ या भाजपमधील इच्छुकांच्या पदरी निराशा आली. शिंदे गटातील भरत गोगावले, सदा सरवणकर, बालाजी किणीकर, संजय शिरसाट, आशिष जयस्वाल यांनाही विस्ताराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे दहा कॅबिनेट मंत्री आताच झाले आहेत. आता त्यांना दोन किंवा तीन कॅबिनेट मंत्रिपदे आणि तीन किंवा चार राज्यमंत्रिपदे मिळतील. भाजपचेही दहा मंत्री झाले आहेत, पण त्यांना आणखी किमान १५ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता असल्याने संधी द्यायला वाव आहे.
अपक्षांना स्थान नाही, विधान परिषदेलाही ठेंगा
भाजप किंवा शिंदे गटाच्या समर्थक अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. आधी राज्यमंत्री असलेले बच्चू कडू, राजेंद्र यड्रावकरही वंचित राहिले. विधान परिषदेच्या सदस्यांनाही संधी मिळाली नाही.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोण?
मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले ॲड. आशिष शेलार, डॉ. संजय कुटे किंवा चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे यांच्यापैकी एकाला चंद्रकांत पाटील यांच्या जागी भाजप प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली जाऊ शकते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमक चेहरा म्हणून प्रदेशऐवजी मुंबई भाजपचे अध्यक्षपद शेलार यांच्याकडे देण्याबाबतही विचार होऊ शकतो.