Join us

महापालिकेची २३ उद्याने २४ तास खुली राहणार; प्रशासनाचा सकारात्मक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 1:03 AM

उद्याने खुली असतानाच परिरक्षण व देखभालीची कामे

मुंबई : मुंबई महापालिकेची साधारणपणे ७५० उद्याने आहेत. या उद्यानांचा सकारात्मक परिणाम जसा पर्यावरणाच्या दृष्टीने आहे, तसाच तो आरोग्याच्या दृष्टीनेदेखील आहे. याबाबत नागरिकांनी केलेल्या विनंतीचा सकारात्मक विचार करत महापालिकेची २३ उद्याने ही २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी घेतला आहे.

देशातील महापालिकांमध्ये सर्वाधिक उद्यानांची चांगली देखभाल करणारी एक महापालिका असा प्रशासनाचा गौरव केला जातो. मुंबई शहर आणि उपनगरात मुंबई महापालिकेची अनेक उद्याने असून, काही उद्यानांची देखभाल दुरुस्ती स्वत: महापालिका करते. तर काही उद्याने ही स्वयंसेवी संस्थांना देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आली आहेत.

प्रवीणसिंह परदेशी यांनी २४ उद्यानांमधील सुरक्षा व्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश देतानाच उद्यानांचे परिरक्षण व देखभाल ही उद्याने खुली असतानाच करण्याचेही निर्देश दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी ९ सप्टेंबरपासून म्हणजे सोमवारपासून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या उद्यानांचा अधिकाधिक लाभ मुंबईकर नागरिकांना घेता यावा, यादृष्टीने महापालिकेने आपल्या ७५० उद्यानांपैकी विविध भागांतील २३ उद्याने २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर या अनुषंगाने महापालिका उद्यांनाच्या प्रवेशद्वारांवर सुधारित वेळांचे फलक तातडीने लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशीही माहिती पालिकेच्या उद्यान खात्याद्वारे देण्यात आली आहे.

या २३ उद्यानांमध्ये होणार निर्णयाची अंमलबजावणी (वॉर्डनिहास तपशील)

  • ए विभागातील कुपरेज बॅण्डस्टॅण्ड उद्यान
  • सी विभागातील भगवानदास तोडी उद्यान
  • डी विभागातील टाटा उद्यान
  • इ विभागातील अब्दुला बरेलिया उद्यान
  • एफ उत्तर विभागातील माहेश्वरी उद्यान
  • एफ दक्षिण विभागातील बिंदू माधव ठाकरे उद्यान
  • जी दक्षिण विभागातील आद्य शंकराचार्य उद्यान
  • जी उत्तर विभागातील आजी-आजोबा उद्यान या शहर भागातील उद्यानांचा समावेश आहे.
  •  
  • एच पूर्व विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान
  • एच पश्चिम विभागातील रावसाहेब पटवर्धन उद्यान
  • के पूर्व विभागातील श्री. साईलीला मनोरंजन मैदान
  • के पश्चिम विभागातील कमलाकरपंत वालावलकर मनोरंजन मैदान
  • पी दक्षिण विभागातील वेदप्रकाश चढ्ढा उद्यान
  • पी उत्तर विभागातील स्वतंत्रता उद्यान
  • आर दक्षिण विभागातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यान
  • आर मध्य विभागातील गांजावाला उद्यान
  • आर उत्तर विभागातील जरीमरी उद्यान
  • एल विभागातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान
  • एम पूर्व विभागातील बिंदू माधव ठाकरे मनोरंजन मैदान
  • एम पश्चिम विभागातील डी. के. संधू उद्यान
  • एन विभागातील डॉ. केशव बळीराम हेडगेवार उद्यान
  • एस विभागातील शहीद जयवंत हनुमंत पाटील मनोरंजन उद्यान
  • टी विभागातील लाला तुळशीराम उद्यान
टॅग्स :मुंबई महानगरपालिका