Join us

रेल्वे रूळ ओलांडताना रोज ९ प्रवाशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 2:47 AM

७१५ प्रवाशांनी गमावला जीव : तीन महिन्यांची आकडेवारी

मुंबई : सन २०१८च्या पहिल्याच तीन महिन्यांत तब्बल ७१५ रेल्वे प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर रेल्वे रूळ ओलांडताना दररोज सरासरी ९ प्रवाशांना जिवाला मुकावे लागत आहे. या आकडेवारीने ‘सुरक्षित प्रवास-रेल्वे प्रवास’ असा दावा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल केली असून, रेल्वे प्रशासनाचा सुरक्षित प्रवास ‘केवळ जाहिरातीत’ असल्याचे दिसून येत आहे.मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात २५१, फेब्रुवारीत २३० आणि मार्च महिन्यात २३४ अशा प्रकारे केवळ तीन महिन्यांत तब्बल ७१५ प्रवाशांचा रेल्वे अपघातांत मृत्यू झाला आहे. तर दररोज ९ प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडताना जीव गमवावा लागला असल्याचे समोर आले आहे.‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल २०१७-१८’मध्येदेखील रेल्वे अपघात आणि प्रवासी मृत्यूचा आकडा चढा असल्याचे दिसून येते. २०१५ साली रेल्वे अपघातांमध्ये ३ हजार ३०४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर २०१६मध्ये ३ हजार २०२ प्रवासी मरण पावले होते. २०१७मध्ये ३ हजार ३४५ प्रवाशांचा रेल्वे अपघातांत मृत्यू झाला होता.देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील वाहतुकीसाठी रेल्वेला प्रथम पसंती दिली जाते. किंबहुना रेल्वे ही मुंबईकरांची ‘लाइफलाइन’ समजली जाते. मात्र, ही लाइफलाइन मुंबईकरांसाठी ‘डेथलाइन’ ठरत आहे.मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रोज २५८ लोकलच्या २ हजार ९७९ फेºया होतात. यातून तब्बल ७६.५ लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेच्या उत्पन्नात मुंबई उपनगरीय रेल्वेचे आर्थिक योगदान निर्णायक असते. ‘सुरक्षित प्रवास-रेल्वे प्रवास’ अशी जाहिरातही रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. मात्र, तरीदेखील मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी नियमित आणि ठोस पावले उचलण्याबाबत रेल्वे प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे रेल्वे अपघातांवरून स्पष्ट होते.वर्ष अपघाती मृत्यू२०१५ ३,३०४२०१६ ३२०२२०१७ ३०१४२०१८ ७१५ (मार्चपर्यंत)

टॅग्स :लोकल