बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा

By जयंत होवाळ | Published: May 14, 2024 06:01 AM2024-05-14T06:01:24+5:302024-05-14T06:01:48+5:30

वादळामुळे घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर अजस्त्र होर्डिंग फाउंडेशनसह उखडून कोसळले. घटनास्थळी जखमींच्या ओरडण्याचा आवाज येत होता.

9 victims of recklessness in mumbai hoarding collapsed on petrol pump at ghatkopar and stormy wind unseasonal rains hit | बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा

बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा

जयंत हाेवाळ/मनीषा म्हात्रे, लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची एकीकडे धामधूम सुरू असताना महामुंबईला सोमवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. दुपारी चार वाजता वादळामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर अजस्त्र होर्डिंग फाउंडेशनसह उखडून कोसळले. त्यात ८ जणांचा मृत्यू झाला, तर ७८ जण जखमी झाले. मृतांची संख्या वाढली असून, हा आकडा आता १४ वर गेला आहे. 

होर्डिंग अगदी तकलादू पद्धतीने लावले गेल्याचे स्पष्ट झाल्याने बेपर्वाईचे मुंबईकर बळी ठरले आहेत. होर्डिंग आणि पंपाचे छत एकत्रितपणे पेट्रोल पंपावर कोसळल्याने  त्याखाली वाहने दाबली गेली. तर मुंबईत विविध ठिकाणी झाडे पडून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. रात्री नऊपर्यंत ७८ जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटना एवढी मोठी होती की, राष्ट्रीय आपत्ती दलाच्या जवानांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. 

छेडानगरला ठाण्याच्या दिशेने पूर्व द्रुतगती महामार्गावर भारत पेट्रोल पंप आहे. सायन सोडल्यानंतर थेट ठाण्यापर्यंत पेट्रोल पंप नसल्याने या पंपावर वाहनांची मोठी गर्दी असते. चारच्या सुमारास इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पावसापासून बचाव करण्यासाठी काही मोटारसायकलस्वारही तेथे थांबले होते. घटनास्थळी अग्निशामक दलाचे प्रमुख रवींद्र अंबुलगेकर यांच्या पथकाने तातडीने मदतकार्य सुरू केले. 

घटनास्थळी जखमींच्या ओरडण्याचा आवाज

होर्डिंग आणि पेट्रोल पंपाच्या पत्र्याखाली वाहने विचित्र पद्धतीने दबली गेल्याने बचाव कार्य करणे आव्हानात्मक झाले होते. जवान अगदी लहानशा जागेतून आत प्रवेश करत होते. अनेक जण जखमी असल्याचे लक्षात आल्यानंतर झपाट्याने कार्यवाही सुरू झाली. घटनास्थळी जखमींच्या ओरडण्याचा आवाज येत होता. आवाजाच्या दिशेने जाऊन जवान तेथे धाव घेत होते. जखमींची सुटका करत होते. अडकलेले काही जण आवाज देऊन मदतीची याचना करत होते. मात्र, आत अंधार असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचताना पथकाला कसरत करावी लागली. 

घाटकोपर परिसरात एकूण ४ मोठे होर्डिंग आहेत. दुर्घटना घडलेले होर्डिंग लोहमार्ग पोलिस वसाहतीच्या हद्दीत असून महाराष्ट्र राज्य पोलिस वेलफेअर असोसिएशनच्या नावे ही जागा आहे. त्या होर्डिंगला अधिकृत परवानगी नसून मुंबई महापालिकेने यापूर्वीही नोटीस बजावली होती. पालिकेच्या नियमानुसार होर्डिंगचा आकार हा जास्तीत जास्त ४० बाय ४० असावा, मात्र हे होर्डिंग १२० बाय १२० या आकाराचे होते. 

मृत : मोहम्मद अक्रम, दिनेश जयस्वाल, चंद्रमणी प्रजापती, भरत राठोड

घटनास्थळी अनेक जण सुरक्षित असल्याचे लक्षात आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाहिन्यांचा  ताफा आतील रस्त्यावर तैनात करण्यात आला. बाहेर काढलेल्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात येत होते. जेसीबी यंत्रे घटनास्थळी आणण्यात आली. त्यानंतर पंपाच्या मागील बाजूस मातीचा ढिगारा उपसून आपत्कालीन वाहनांसाठी रस्ता तयार केला जात होता. जवळपास ४० रुग्णवाहिन्या तैनात करण्यात आल्या होत्या.   

वादळी वाऱ्यामुळे काय झाले?

- वडाळा येथे श्रीजी टॉवरच्या शेजारील कार पार्किंगसाठी बनविण्यात आलेले बांधकाम कोसळले. त्याखाली १५ कार, १० दुचाकी दबल्या गेल्या.
- लालबाग ब्रिजवर तेल सांडल्याने टेम्पो उलटला. त्यामुळे ब्रिजवरील वाहतूक पूर्णत: बंद झाली होती. 
- ठाणे ते मुलुंड मार्गावर ओव्हर हेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली. घाटकोपरपासून कुर्ला आणि सगळ्याच रेल्वे स्थानकांवर प्रवासी अडकून पडले होते.
- पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवाही तांत्रिक कारणामुळे १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होती.
- वर्सोवा - अंधेरी- घाटकोपर मेट्रो मार्गावर एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशनदरम्यान कापडाचा एक तुकडा ओव्हरहेड वायरवर आल्याने मेट्रो बंद पडली होती.
- गुंदवली ते आरेदरम्यान ओव्हरहेड वायरवर बॅनर पडल्याने मेट्रो सेवा बंद पडली होती.
- कळवा येथे महापारेषणाच्या २२० केव्ही बसमध्ये बिघाड झाल्यामुळे आणि कळवा आणि खारघर येथे इंटरकनेक्टिंग ट्रान्सफॉर्मर ट्रिप झाल्यामुळे तात्पुरता वीज पूरवठा खंडित झाला होता.

दैव बलवत्तर म्हणून थाेडक्यात बचावला

शफिक रेहमानी हे दुचाकी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आले होते. पेट्रोल पंपाच्या आत ते प्रवेश करणार तेवढ्यात त्यांना त्यांचा मित्र भेटला. दुचाकी बाजूला घेऊन ते बोलत बसले आणि काही क्षणातच दुर्घटना घडली; पण ते थोडक्यात बचावले.

आत कोणी आहे का, मदतीसाठी आलो 

अग्निशमन दलाचा एक जवान हातात मेगाफोन घेऊन ‘आत कोणी आहे का, असल्यास प्रतिसाद द्या. अंदर कोई है क्या, अशी उद्घोषणा करून आत अडकलेल्याकडून प्रतिसादाची अपेक्षा करता होता. आम्ही तुमच्या मदतीसाठी आलो आहोत, धीर सोडू नका , असे सांगून धीर देण्याचा प्रयत्न केला जात होता. पाण्याच्या लहान बाटल्याही आत टाकल्या जात होत्या.

रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा 

दुर्घटनाग्रस्त भागाच्या आत शिरून काही स्थानिकही अग्निशमन  दलाच्या जवानांना मदत करत होते. आत कोणी सापडल्यास लगेच स्ट्रेचर आणून दिले जात होते. बाहेर रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला जात होता.

फोन लागत नसल्याने चिंता

काहीजणांचे आप्तस्वकीय या भागात आले होते. दुर्घटनेची बातमी टीव्हीवर कळताच त्यांनी या भागात आलेल्या आपल्या नातेवाइकांना  फोन करण्यास सुरुवात केली. त्यापैकी काहींचा फोन न लागल्याने त्यांच्या काळजाचा ठोका चुकला.  एकजण नातेवाइकाला शोधण्यासाठी मुंब्र्याहून आला होता. एका महिलेला अश्रू अनावर झाले होते. माझा नवरा कोठे गेला अशी  विचारणा त्या करत होत्या. 

भावेश भिंडेविरुद्ध गुन्हा दाखल 

पंतनगर पोलिस ठाण्यात होर्डिंगचा मालक व इगो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक भावेश भिंडेविरुद्ध रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

होर्डिंगला खालिद यांनी दिली होती परवानगी

पूर्व द्रुतगती मार्गावरील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर पोलिसांकडे बोट दाखविण्यात येत आहे. आता या होर्डिंगला रेल्वेचे माजी पोलिस आयुक्त कैसर खालिद यांच्या कार्यकाळात परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पालिकेकडून आतापर्यंत दिलेल्या नोटीसबाबतही रेल्वे पोलिसांकडून चाचपणी सुरू केली आहे.

दुर्घटनेनंतर झालेल्या आरोपांमुळे होर्डिंगच्या परवानगीची चर्चा सुरू झाली. २०२१ मध्येच होर्डिंगला परवानगी देण्यात आली होती. जवळपास दहा ते २० वर्षांसाठी ही परवानगी दिल्याचे समजते. इगाे मीडिया कंपनीला कंत्राट दिले होते. सुरुवातीला सर्व बाबी पडताळून परवानगी देण्यात आल्याचे समजते. या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

याबाबत कैसर खालिद यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. नेमक्या कुठल्या निकषाखाली ही परवानगी देण्यात आली? यामध्ये आणखीन किती जणांची परवानगी घेण्यात आली होती? तसेच हे अनधिकृत होते तर पालिकेने कारवाई का केली नाही? हा चौकशीचा भाग आहे. त्यानुसार, तपास यंत्रणा चौकशी करत आहे. पूर्व पोलिस आयुक्तांनी यासाठी परवानगी दिली होती. याबाबत अधिक चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे रेल्वे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
 

Web Title: 9 victims of recklessness in mumbai hoarding collapsed on petrol pump at ghatkopar and stormy wind unseasonal rains hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.