9 वर्षाच्या मुलाची भन्नाट आयडिया; मुंबईकर गर्वितने केली दृष्टिदोष शोधणाऱ्या अॅपची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 12:51 AM2020-03-09T00:51:21+5:302020-03-09T06:30:29+5:30
‘व्हाइटहॅट ज्युनियर’ने घेतलेल्या सिलिकॉन व्हॅली उपक्रमामधील १२ विजेत्यांपैकी गर्वित एक आहे. भारतातून आलेल्या तब्बल ७,००० प्रवेशिकांचे परीक्षण केल्यानंतर त्याच्या अॅपची निवड झाली होती.
मुंबई : मुंबईतील नऊ वर्षांच्या गर्वित सूदने ‘दृष्टी’अॅप तयार केले आहे. त्या अॅपच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या डोळ्यांची तपासणी करता येते आणि त्याद्वारे डोळ्यांचे किंवा दृष्टिदोषाशी संबंधित आजारांचे निदान करता येते, तसेच योग्य वेळी त्यावर उपचार करता येतात.
गर्वितच्या डोळ्यांचा अपाय हा उशिरा समोर आला आणि तो दृष्टिदोष असल्याचे निदान झाले. उपचार घेत असताना त्याला ‘व्हाइटहॅट ज्युनियर’ व्यासपीठावर जो अनुभव आला, त्याचा वापर त्याला इतरांसाठी करून द्यायचा होता. त्यासाठी त्याने अॅपची निर्मिती केली. ते वापरायला अगदी सोपे असे अॅप असून, वाचकाला त्यांच्या मोबाइलच्या स्क्रीनवरील विविध आकारांतील केवळ काही आद्याक्षरे आणि आकडे यामध्ये वाचायचे असतात. त्यांच्या वाचनातील यशाच्या आधारे त्या व्यक्तीच्या नजरेतील परिणामकारकता शोधता येते. त्यातून त्या व्यक्तीला पुढील तपासणीसाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे का, या गोष्टीची स्पष्टता येते. ग्रामीण भागात डॉक्टरांपर्यंत पोहोचणे कठीण असते आणि अशा वेळी हे अॅप खूप कामी येऊ शकते. अगदी डॉक्टरही आपल्या रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यासाठी या अॅपचा वापर करू शकतात.
‘व्हाइटहॅट ज्युनियर’ने घेतलेल्या सिलिकॉन व्हॅली उपक्रमामधील १२ विजेत्यांपैकी गर्वित एक आहे. भारतातून आलेल्या तब्बल ७,००० प्रवेशिकांचे परीक्षण केल्यानंतर त्याच्या अॅपची निवड झाली होती. मुलांना त्यांच्या आयुष्यातील समस्या सोडविणारी एखादी संकल्पना राबविण्यासाठी आणि त्याद्वारे स्वतंत्रपणे एक अॅप निर्माण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
सिलिकॉन व्हॅलीत जाण्याची मिळणार संधी!
या उपक्रमाचा एक भाग म्हणून गर्वितला अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये जाण्याची संधी प्राप्त होणार आहे. तेथे त्याला नेक्सास व्हेंचर पार्टनर्स आणि आउल व्हेंचर्स यांसारख्या आघाडीच्या व्हेंचर कॅपिटॅलिस्ट्स (व्हीसी)कडे आपल्या अॅपचे सादरीकरण करता येणार आहे. या आठवडाभराच्या ट्रीपदरम्यान त्याला सिलिकॉन व्हॅलीतील काही आघाडीच्या उद्योजकांना भेटण्याची संधी मिळणार आहे. त्याद्वारे त्याला उद्योजकतेतील काही महत्त्वपूर्ण धडे घेता येणार आहेत. त्याशिवाय त्याला ‘गुगलप्लेक्स’ला भेट देता येणार आहे आणि तेथे अभियंत्यांना भेटता येणार आहे. त्याशिवाय त्याला वायमो कारखान्याला भेट देता येणार आहे. त्या माध्यमातून चालकरहित गाड्या पाहता येणार असून, त्यांच्या उत्पादन व्यवस्थापकांशी संवाद साधता येणार आहे.