मुंबई - बेकारिस झुमाबेक या कझाकस्तानच्या नऊ वर्षीय मुलाला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पोटाचा गंभीर आजार असल्याचे निदान झाले. त्याच्या पोटातील आतडे स्वत:भोवती गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यावर परळ येथील ग्लोबल रुग्णालयात नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. बेकारिसला त्याच्या मामाने आतडे दान करून त्याचे प्राण वाचविले. जिवंत व्यक्तीने आतडे दान करण्याची भारतातील ही पहिलीच घटना आहे.
सेंटिनेल ग्राफ्टसह केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेत दात्याच्या शरीराच्या विशिष्ट भागातून त्वचा घेतली जाते आणि रुग्णाच्या आवश्यक असलेल्या भागात लावली जाते. रुग्णालयातील डॉ. गौरव चौबळ यांनी अन्य तज्ज्ञांसह ही गुंतागुंतीची आव्हानात्मक शस्त्रक्रिया केली. प्रत्यारोपणासाठी कुटुंबाचे समुपदेशन केले आणि त्याचे मामा नुरकानत येरकिनो अवयवदानासाठी पुढे आले. त्यानंतर, ३० जानेवारीला आतड्यांचे प्रत्यारोपण झाले. तब्बल १४ तास शस्त्रक्रिया चालली.
बेकारिसला सुरुवातीला त्रास झाल्यानंतर तज्ज्ञांच्या चमूने अपेंडिक्ससह लहान आतड्याचा भाग शस्त्रक्रियेने काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, गुंतागुंत वाढली आणि पुन्हा त्याला शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. त्याच्या लहान आतड्याची स्थिती सुधारून मोठ्या आतड्याचा दुसरा भाग काढून टाकण्यात आला, ज्यामुळे ‘शॉर्ट गट सिंड्रोम’ नावाची स्थिती निर्माण झाली, तेव्हापासून रुग्णाचे वजन कमी होऊ लागले होते.
मांडीतून घेतला ग्राफ्टमुलाच्या मामाच्या मांडीपासून फ्री फ्लॅप ग्राफ्ट काढून रुग्णाच्या मांडीवर रोपण करायला सांगितले. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे जिवंत दात्याच्या प्रत्यारोपणाचा प्रयत्न केला गेला आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अतिदक्षता विभागामध्ये हलविण्यात आले. आता या रुग्णाची तब्येत हळूहळू सुधारत आहे. - डॉ. गौरव चौबळ, प्रत्यारोपण शल्यचिकित्सक.
सामान्य आयुष्य जगता येईल मुलाचे कमी होणारे वजन आणि अन्नाचे सेवन न करता येणे, या समस्या पाहून चिंताग्रस्त झालो होतो. कोणताही संसर्ग मुलासाठी धोकादायक ठरू शकतो. या शस्त्रक्रियेमुळे आमच्या मुलाला सर्वसामान्य आयुष्य जगता येईल, याचा आनंद आहे, अशी भावना आई श्यानारगुल नसिपकालियेवा यांनी व्यक्त केली.