नवीन मोटार वाहन कायद्यात ९० सुधारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 06:12 AM2019-08-11T06:12:51+5:302019-08-11T06:13:22+5:30
नवीन मोटार वाहन कायदा नुकताच मंजूर करण्यात आला आहे. त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. याबाबत वाहतूकतज्ज्ञ रणजीत गाडगीळ यांच्याशी साधलेला संवाद...
- नितीन जगताप
नवीन मोटार वाहन कायदा नुकताच मंजूर करण्यात आला आहे. त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. याबाबत वाहतूकतज्ज्ञ रणजीत गाडगीळ यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न - नवीन मोटार वाहन कायद्याची वैशिष्ट्ये काय आहेत?
उत्तर - १९८८ मोटार वाहन कायदा हा खूपच जुना कायदा आहे. त्याला ३० वर्षे झाली. आता नवीन कायद्यात ९० सुधारणा करण्यात आल्या आहेत. रस्ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर दंडाच्या रकमेत वेळेनुसार वाढ केली आहे. ती पाचपट वाढविली आहे. तसेच यापुढे दरवर्षी राज्य सरकार या कायद्यामध्ये दंडाची रक्कम वाढवू शकते, अशी तरतूद केली आहे. यासोबत अल्पवयीन मुले वाहन चालवितात त्यामुळे अपघात घडतात. यासाठी त्याचे पालक किंवा त्या वाहनाच्या मालकाला जबाबदार धरण्याची तरतूद या कायद्यात आहे. त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
प्रश्न - नवीन मोटार वाहन कायद्यामध्ये कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत?
उत्तर - नवीन कायद्यामध्ये दोन ते तीन सुधारणा आवश्यक आहेत. नवीन वाहनचालकांमुळे अपघात होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे परदेशात ग्रॅज्युएटेड लायसन्स हा प्रकार असतो. त्यामध्ये नवीन वाहनचालकांना काही बंधने असतात. जसा वाहनचालकांचा अनुभव वाढतो त्याप्रमाणे बंधने कमी केली जातात. नियमांचे उल्लंघन केल्यास लायसन्सवर पॉइंट मिळतात. त्याची मर्यादा ओलांडल्यास लायसन्स रद्द केले जाते. तसेच अनेक वर्षे वाहतूक नियमांचे काही उल्लंघन केले नाही तर ते पॉइंट काढून टाकले जातात, ते आवश्यक आहे. नवशिके आहेत त्यांच्याबाबत अजून कठोर नियम करायला हवेत.
वाहनचालकांचीही जबाबदारी
वाहन चालविणे आपला अधिकार नसून ती आपली जबाबदारी आहे. ती आपण पार पाडली पाहिजे. सरकारने कायद्यात सुधारणा केली आहे त्यामध्ये लोकांवर दंडात्मक कारवाई व्हावी, त्यांना त्रास व्हावा असा उद्देश नाही. त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. दरवर्षी अपघातात दीड लाख नागरिक जीव गमावतात. काही देशांत हे प्रमाण शून्य आहे. आपणही या देशांप्रमाणेच वाटचाल करणे गरजेचे आहे. सरकारची जबाबदारी आहे, तशी वाहतुकीचे नियम पाळून वाहन नीट चालवणे ही वाहनचालकांचीही जबाबदारी आहे, असे गाडगीळ म्हणाले.
यांच्यावरही
होणार कारवाई
रस्ता खराब असेल, डागडुजी केली नसेल तर त्यासाठी कंत्राटदार, रचनाकार किंवा ज्यांनी रस्ता बांधून घेतला त्यांच्यावरही कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात केली आहे.
नवशिक्या वाहनचालकांसाठी नियम अजून कठोर करायला हवेत. - रणजीत गाडगीळ