Join us

लहानमोठे ९० टक्के कोचिंग क्लासेस आले डबघाईस...!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 2:03 AM

चालकांच्या चिंतेत वाढ; अनलॉक ५ अंतर्गत कोचिंग क्लासेस सुरु करण्याची परवानगी देण्याची मागणी

मुंबई : शाळा सुरू करण्यासाठी केंद्र्राने नियमावली जाहीर केली, मात्र याच वेळी कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठीही राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी क्लास संचालक करत आहेत.अनलॉक ५च्याअंतर्गत शाळा, शैक्षणिक संस्था आवश्यक त्या कर्मचारी संख्येत सुरू झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील ९०टक्के कोचिंग क्लासेस संचालक हे लहान व मध्यम वर्गांमध्ये मोडतात आणि ते आता आर्थिक डबघाईस आलेले आहेत. कोचिंग क्लासेसवर बंधने का असा प्रश्न विचारत सोशल डिस्टंसिन्गचे नियम, मास्क , सॅनिटायझर यांचे नियम पाळून क्लास सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.राज्यात जवळपास राज्यात सुमारे १ लाख खासगी क्लासचालक असून त्यात ५ लाखांहून अधिक खासगी शिक्षक काम करत असल्याने तब्बल २५ लाख लोकांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर केल्यानंतर सर्व कोचिंग क्लासेस बंद झाले. तेव्हापासून आतापर्यंत आम्हाला काही कर्मचा?्यांना पगार द्यावे लागत असून मोठे नुकसान सहन करावा लागत आहे. एप्रिल ते जून महिन्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी क्लासमध्ये प्रवेश घेतात. मात्र करोनामुळे आतापर्यंत एकही प्रवेश झालेला नाही, याकडे कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशनचे राज्य अध्यक्ष बंडोपंत भुयार यांनी लक्ष वेधले आहे. लॉकडाऊनमुळे बहुतांश लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शाळा, महाविद्यालय याबरोबरच शासनाला खासगी क्लासेस सुरू करण्याबाबतचे धोरण ठरवावे लागणार आहे. त्यासाठीचे नियम, निकष तयार करावेत, अशी भूमिका क्लास चालक संघटना व्यक्त करत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि क्लास चालकांचा व्यवसाय दोन्ही ठप्प आहेत. काही खासगी क्लासेस आॅनलाइन क्लास चालवत आहेत. प्रवेशही झाले आहेत. मात्र, पालक, विद्यार्थी तितके समाधानी नाहीत. आॅनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांना अडचणी येतच आहेत, तशा त्या शिक्षकांनाही येत आहेत. त्यामुळे संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी तरी किमान दहा मिनिटे वेळ द्यावा आणि आमच्याही समस्या ऐकून घ्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी पत्राद्वारे केली आहे.