मुंबई : अयोध्येत संपन्न झालेल्या श्री रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वसंध्येला समारोप झालेल्या बासरी उत्सवामध्ये प्रख्यात बासरी वादक पं.हरिप्रसाद चौरसिया यांना जीवन गौरव पुरस्कार, तसेच गुरुकुल सन्मान देऊन गौरविण्यात आले. ठाण्यात गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या बासरी उत्सवामध्ये चौरसिया यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी ९० बासरी वादकांनी प्रभू श्रीरामाला समर्पित भक्तिगीतांचे स्वर छेडले.
बासरी उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी फ्लूट सिम्फनीमध्ये ८ ते ८० वर्षे वयोगटांतील ९० बासरी वादकांनी बासरी वादन सादर केले. त्यानंतर, पं.स्वपन चौधरी यांना पं. हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. स्वपन चौधरी यांच्या एकल तबला वादनानंतर शशांक सुब्रमण्यम यांनी कर्नाटकी बासरी वादन सादर केले. भारतीय शास्त्रीय संगीताचा त्यातही बासरी व इतर संगीत प्रकारांचा प्रसार आणि प्रचार करणे व त्याला लोकप्रियता मिळवून देणे, या हेतूने दरवर्षी हे आयोजन केले जाते.