नितीन जगताप
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरतो न सावरतो तोच दुसरी लाट आली. त्यामुळे उद्योगधंद्यांचे मोठे नुकसान झाले. तरीही सामाजिक बांधीलकीतून अनेक उद्याेजक कामगार, काेराेनाबाधितांसाठी मदत करीत आहेत. याबाबत एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक आणि अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांच्याशी साधलेला संवाद.
* लघू, मध्यम उद्योगावर लॉकडाऊनचा कसा परिणाम झाला ?
राज्यात कामगार येत नाहीत; त्यामुळे ९० टक्के उद्योगधंदे बंद आहेत. त्यासोबतच पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. कच्चा माल मिळत नाही. अनेक कारखान्यांनी कच्च्या मालाची ऑर्डर दिली आहे; पण त्यांना डिलिव्हरी करण्यास नकार मिळत आहे. कच्चा माल कमी उपलब्ध आहे; त्यामुळे त्याची आवक कमी झाली आहे. कच्च्या मालाचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. लॉकडाऊनमुळे कार्यालये, उद्योगधंदे बंद आहेत. एप्रिल महिन्यात २० हजार कोटींपर्यंत नुकसान होईल. महाराष्ट्रातून ३५ हजार कोटींचा जीएसटी दिला जातो; पण हा आकडा आता १० ते १२ हजार कोटींवर येणार आहे.
* कोरोनाच्या काळात उद्योजक कशा प्रकारे मदत करीत आहेत?
कोरोनामुळे उद्योगधंद्यांना फटका बसला आहे, तरीही अनेक उद्योजक कामगारांना कामावरून न काढता त्यांना घरी बसून पगार देत आहेत. तसेच कामगारांना अन्नधान्य, औषधे यांचीही मदत केली जात आहे. रुग्णांना ऑक्सिजन मिळावा यासाठीही उद्योजक पुढाकार घेत आहेत. उद्योजकांनी आपले काम बंद करून रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा केला आहे. यामध्ये मुंबई, नाशिक, ठाणे, कोल्हापूर, औरंगाबाद, जळगाव, नागपूर, अमरावती अशा अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.
* राज्य सरकारकडून काय अपेक्षा आहेत?
जे उद्योजक किंवा आस्थापना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत आहेत त्यांना २ मेपासून उद्योग सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी. तसेच जे स्थलांतरित कामगार गावी निघून गेले आहेत, त्यांना परत आणण्यासाठी व्यवस्था करावी. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली आहे, त्यावर अंकुश आणायला हवा. ज्या कंपन्या सुरू होत्या; पण दीड महिन्यापासून अडचणीत आल्या आहेत, त्यांचे खाते एनपीए होऊ नये म्हणून आरबीआयसोबत चर्चा करावी. या उद्योगधंद्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून पॅकेज मागण्यात यावे.
* लघू, मध्यम उद्योजकांना काय आवाहन कराल ?
कोरोनाची दुसरी लाट आहे, ती धोकादायक आहे. कोरोना विषाणू केवळ घसा आणि नाकातून न जाता डोळ्यांतूनही जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्व उद्योजकांनी आपली आणि कर्मचाऱ्यांची काळजी घेऊन उद्योग सुरू करावा. तसेच सरकारने कोरोनाबाबत जी नियमावली जाहीर केली आहे, तिचे काटेकोरपणे पालन करावे.
मुलाखत : नितीन जगताप
...............................................