लोकलच्या ९० टक्के फेऱ्या सुरू, सर्वांसाठी रेल्वेसेवेची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:18 AM2020-11-22T09:18:11+5:302020-11-22T09:18:11+5:30
सर्वांसाठी रेल्वेसेवेची प्रतीक्षा : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावध पवित्रा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वसामान्यांसाठी बंद ...
सर्वांसाठी रेल्वेसेवेची प्रतीक्षा : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावध पवित्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकलसेवा मर्यादित घटकांसाठी सुरू आहे. त्यामध्ये एका-एका घटकाची वाढ करण्यात येत आहे. नियमित रेल्वे फेऱ्यांच्या तुलनेत आता उपनगरी रेल्वेच्या ९० टक्के फेऱ्या होत आहेत. मात्र सर्वांसाठी रेल्वेसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे. काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सावध पवित्रा घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
याबाबत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, राज्य सरकारने रेल्वेकडे माहिती मागविली ती देण्यात आली आहे. त्यानंतर सरकारकडून याबाबत चर्चा झाली नाही. कोरोनापूर्वी मध्य रेल्वेच्या नियमित १,७७४ फेऱ्या होत होत्या. आता एकूण १,५८० फेऱ्या होत आहेत. नेहमीच्या तुलनेत आता ८९ टक्के फेऱ्या होत आहेत. तसेच उर्वरित फेऱ्या सुरू करण्याचीही तयारी आहे.
तर पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, राज्य सरकारने काही माहिती मागविली होती ती त्यांना देण्यात आली आहे. त्यानंतर कोणताही संपर्क साधण्यात आला नाही. काही घटकांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी, अशी विनंती करण्यात आली त्यानुसार प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या नियमित १,६७८ फेऱ्या होतात त्यापैकी १,२०१ फेऱ्या सध्या सुरू आहेत. एकूण फेऱ्यांपैकी ८८ टक्के फेऱ्या सुरू आहेत. तर उर्वरित फेऱ्या एका दिवसाच्या नोटीसवर सुरू करण्याची आमची तयारी आहे.
* सामान्यांच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नाही
सामान्यांसाठी रेल्वे प्रवास बंद असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण हाेताे. कोरोनाकाळात राज्य सरकारने सर्वांसाठी रेल्वे कशी सुरू ठेवता येईल, याचे उपाय सुचवावेत. रेल्वेनेही आपल्या योजना असतील त्याची देवाण-घेवाण करावी. त्यामुळे सामान्यांच्या रेल्वे प्रवासाचा मार्ग मोकळा होईल. पण, रेल्वे प्रवासाबाबत केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नाही.
- मधू कोटीयन,
अध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघ
* भेदभाव का केला जातो?
रेल्वेने सामान्य महिलांना प्रवासास मुभा दिली आहे, पण पुरुषांना नाही. काेरोना तर असा भेदभाव करीत नाही. मग रेल्वे का करते? गर्दीच्या वेळेत कमी प्रवासी प्रवास करतील असा प्रयत्न का केला जात नाही? कार्यालये सुरू होण्याच्या वेळा सकाळी ७ ते ११ आणि बंद होण्याच्या वेळा दुपारी ३ ते रात्री ९ अशा काळात ठेवायला काय हरकत आहे?
- अजित गोखले, प्रवासी