९० टक्के मुंबईकरांना मौखिक आरोग्याच्या तक्रारी; तातडीने उपचार करणे गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 12:56 AM2019-09-12T00:56:55+5:302019-09-12T00:57:27+5:30
देशातील १० पैकी आठ मुलांमध्ये आढळली समस्या
मुंबई : राष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, देशातील १० पैकी ८ मुलांमध्ये मौखिक आरोग्याच्या समस्या असून ९० टक्के मुंबईकरही मौखिक आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहेत. यावर लगेच इलाज करणे गरजेचे आहे. लहान मुलांमध्ये आढणाऱ्या काही समस्यांमध्ये प्लाक जमा होणे, दातांवरील पांढरे डाग, दिसून येणारी कीड, हिरड्यांना सूज येणे, श्वासास दुर्गंधी येणे आणि हिरड्यांतून रक्त येणे इत्यादींचा समावेश आहे.
सर्वेक्षणानुसार, ३ पैकी २ मुलांच्या दाताला कीड लागली असून ती वाढण्याचा धोका आहे. देशभरातील प्रदेशानुसार मौखिक आरोग्याच्या समस्येची टक्केवारी पूर्व भारतात अधिक आहे. पूर्व भारतात हे प्रमाण ८९ टक्के, पश्चिम भारतात ८८, उत्तर भारतात ८५ तर दक्षिण भारतात ६४ टक्के आहे. मौखिक आरोग्याच्या समस्येने ग्रस्त अशा मोठ्या शहरांची टक्केवारी पाहिल्यास मुंबईत हे प्रमाण ९० टक्के आहे, तर कोलकाता ९३ टक्के, हैदराबाद ८२, दिल्ली ७९, चेन्नई ६८ आणि बंगलोर ४६ टक्के आहे
मुलांचे खरे मौखिक आरोग्य आणि त्यांच्या पालकांनी केलेल्या अपेक्षा यांमध्ये मोठी तफावत आहे. लोकांमध्ये मौखिक आरोग्याविषयी जागरूकता नाही. १० पैकी किमान ८ पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांचे दात हे निरोगी आहेत, पण दातांची तपासणी केल्यावर असे आढळून आले की, ८० टक्के मुलांमध्ये किमान एका प्रकारच्या मौखिक आरोग्याची समस्या आहे.
अभ्यासानुसार, बहुतेक मुले ही दोन वेळा दात घासणे किंवा नियमितपणे दातांची तपासणी करणे यांसारख्या मूलभूत अशा मौखिक आरोग्याच्या गोष्टी करत नाहीत. ७० टक्के मुले दोनदा दात घासत नाहीत, तर ६० टक्क्यांहून अधिक मुलांनी मागील एक वर्षाच्या कालावधीत दंतचिकित्सकाला भेट दिलेली नाही. १० पैकी ८ मुलांमध्ये दातांची समस्या ही रोज गोड खाण्याने निर्माण झालेली आहे. जवळजवळ ४४ टक्के मुलांमध्ये मोठ्या अशा उपचारांची गरज भासली आहे. यामध्ये रिस्टोरेशन, रूट कॅनल किंवा दात काढून टाकावा लागला आहे.
जनजागृती करण्याची आवश्यकता
इंडियन असोसिएशन आॅफ पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. व्ही. गोपालकृष्णन यांनी सांगितले, या अभ्यासातून देशभरातील मौखिक आरोग्याची समस्या अधोरेखित होते, जेणेकरून लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज आहे. दातांच्या समस्यांचे व्यवस्थापन आणि चांगले मौखिक आरोग्य यामुळे दात मजबूत होऊन व्यक्तीचे एकंदरीत जीवन चांगले होण्यास मदत होते.