मुंबई : कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये ९० टक्के बाधित हे ओमायक्रॉनचे आहेत, असे आम्ही निश्चितपणे म्हणून शकतो. ओमायक्रॉन हा श्वसनात अडचणी निर्माण करणारा संसर्गजन्य आहे, असे डॉ. झरीर उदवाडिया, डॉ. तुषार शाह यांनी म्हटले. वैद्यकीय व्यावसायिकांच्या सोमवारी येथे झालेल्या बैठकीत ते म्हणाले की, श्वास घेण्यात अडचणी निर्माण करणारा ओमायक्रॉन हा संसर्गजन्य विषाणू जगाने आतापर्यंत पाहिला नव्हता.
तो डेल्टापेक्षा ३ ते ५ पट जास्त संसर्गजन्य आहे. त्याची सौम्य लक्षणे ही प्रामुख्याने अप्पर रेस्पिरेटोरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये दिसतात ती म्युटंट ओमायक्रॅान स्ट्रेनच्या कमी प्रजोत्पादन क्षमतेमुळे की लस की पूर्वी बाधा झाल्यामुळे वाढलेल्या प्रतिकार क्षमतेमुळे हे अजून माहीत नाही. डॉ. तुषार शाह यांनी पूरक लसीची शिफारस केली असून ते म्हणतात की, जर शक्य असेल तर आधी घेतलेल्या लसीऐवजी दुसरी लस घ्या. ओमायक्रॉनची बाधा झाल्यावर आता उपलब्ध असलेली अँटिबॉडी कॉकटेल निरूपयोगी आहे.
श्रीमंतांमध्ये पसरलेले हे खूळ असून अँटिबॉडी कॉकटेलची विचारणा करणे कृपया थांबवा. जर गर्दीच्या जागी किंवा जोखमीच्या ठिकाणी असाल तर एक मास्क एन ९५ आणि दुसरा सर्जिकल मास्क वापरावा. एसआरएल डायग्नोस्टिक्सचे मुख्य पॅथोलॉजिस्ट डॉ. अविनाश फडके यांनीही यावेळी बोलताना सीटी व्हॅल्यूज या महत्त्वाच्या नसल्याला दुजोरा दिला आणि संसर्गाची तीव्रता ठरवताना त्याचा विचार केला जाऊ नये, असे म्हटले आहे.
रुग्णालयात दाखल होणे टळते...
ओमायक्रॉनचा संसर्ग हा लसीमुळे रोखता येत नाही; परंतु त्या विषाणूमुळे रुग्णालयात दाखल होणे किंवा आजार गंभीर होणे टळते, असे दिसते.ओमायक्रॉनचा परिणाम फुफ्फुसांवर होत नाही आणि त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता ७० टक्के नाही.