Join us

९३ टक्के नगरसेवकांना लाल शेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 12:58 AM

कामगिरी घसरली; रस्त्याचे नामकरण अधिक महत्त्वाचे

मुंबई : आपल्या प्रभागातील जनतेच्या नागरी तक्रारींवर आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात तब्बल ९३ टक्के नगरसेवक अपयशी ठरले आहेत. बिगर शासकीय संस्थेने तयार केलेल्या प्रगतिपुस्तकात २०६ नगरसेवकांना ५० टक्क्यांहून कमी गुण मिळाले आहेत. विविध समित्या आणि महासभेमध्ये नागरी प्रश्न उपस्थित करण्याचे प्रमाणही गतवर्षीच्या तुलनेत कमी झाले असल्याचे समोर आले आहे.जनतेचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक आपल्या प्रभागातील विविध नागरी समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून त्याचे निवारण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावित असतात. नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये बऱ्याचवेळा रस्त्यांच्या नामकरणाचे प्रश्न अधिक असल्याचे आतापर्यंतच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. या वर्षीही त्यापेक्षा वेगळे चित्र नाही.२०१४ मध्ये २८४१ नागरी प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केले होते. मात्र गेल्या वर्षभरात २५१७ प्रश्न विचारण्यात आले आहेत. यापैकी २०६ म्हणजे ९३ टक्के नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्यांच्या तुलनेत उपस्थित केलेल्या प्रश्नांचे गुण ५० टक्क्यांहून कमी आहेत. तर १३५ नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांचा दर्जा ५० टक्क्यांहून कमी होता. यावरून गेल्या वर्षाच्या तुलनेत नगरसेवकांची कामगिरी घसरली असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.प्रश्नांचे प्रमाण घसरले...मुंबईतील प्रभागांचे प्रतिनिधित्व करणारे २२७ नगरसेवक आहेत. या नगरसेवकांनी २०१४ मध्ये २८४१ नागरी प्रश्न विविध समित्यांमध्ये उपस्थित केले होते. हे प्रमाण २०१८ मध्ये २६०९ वर पोहोचले आणि २०१९ मध्ये यात आणखी घट होऊन २५७१ प्रश्नच विचारले गेले आहेत.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका