विद्यार्थ्याला समाधानकारक कोचिंग न दिल्याबद्दल ९० हजारांचा परतावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 05:01 AM2018-12-07T05:01:03+5:302018-12-07T05:01:13+5:30
कोचिंग क्लासेसची शिकवण्याची पद्धत गोंधळ उडवून टाकणारी असल्याने एका विद्यार्थ्याने दोन वर्षांची फी भरूनही अवघे तीन महिने क्लासला हजेरी लावली.
मुंबई : कोचिंग क्लासेसची शिकवण्याची पद्धत गोंधळ उडवून टाकणारी असल्याने एका विद्यार्थ्याने दोन वर्षांची फी भरूनही अवघे तीन महिने क्लासला हजेरी लावली. संबंधित विद्यार्थ्याला चांगली शिकवणी देण्यास क्लास कमी पडला. तसेच संबंधित क्लास विद्यार्थ्यांची जबाबदारी घेण्यापासून पळ काढत आहे. याचाच अर्थ त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली आहे, असे म्हणत मध्य मुंबईच्या जिल्हा ग्राहक मंचाने आयआयटी राव (मेसर्स राव एज्युसोल्युशन्स प्रा.लि.) कोचिंग क्लासेसला विद्यार्थ्याला परतावा म्हणून ८५ हजार रुपये व मानसिक त्रासापोटी पाच हजार रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत.
मेरज रसूल खान यांनी त्यांचा मुलगा उस्मान खान याला शैक्षणिक वर्ष २०१६-१७ आणि २०१७-१८ अकरावी, बारावी आणि जेईई (मेन्स) साठी आयआयटी रावमध्ये शिकवणी लावली. मेरज रसूल खान यांनी या दोन वर्षांची १ लाख ७० हजार रुपये फीदेखील भरली. मात्र, त्यांच्या मुलाने अवघ्या तीन महिन्यांत शिकवणी सोडली. संबंधित क्लासेसची शिकवणी योग्य नाही. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे गोंधळ उडत असल्याचे म्हणत मुलाने क्लासला जाण्यास नकार दिला.
त्यावर मेरज रसूल खान यांनी क्लासेच्या पदस्थांना कळवत फीची रक्कम परत करण्याची विनंती केली. क्लासेसने दिलेले साहित्य, सरकारी कर आणि तीन महिन्यांचे शिकवणी शुल्क कापून आपल्याला फीची उर्वरित रक्कम द्यावी, असा पत्रव्यवहारही खान यांनी क्लासेसकडे केला. मात्र, फीची रक्कम परत करण्याचे धोरण क्लासचे नाही, असे म्हणत आयआयटी रावने खान यांना फी परत करण्यास नकार दिला. त्यामुळे खान यांनी ग्राहक मंचात धाव घेतली.
सुरुवातीला या तक्रारीवर एकतर्फी सुनावणी झाली. क्लासेसला नोटीस बजावूनही त्यांनी मंचापुढे बाजू मांडली नाही. मंचाने आणखी एक संधी दिल्यावर क्लासेसने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, सायन्सचा अभ्यासक्रम व्यापक असून विद्यार्थ्याला त्याचे आकलन होत नाही. याशिवाय तक्रारदाराला (खान) प्रवेश रद्द करण्याबाबतच्या धोरणाबाबत समजावून सांगितले होते आणि त्यांनी त्यानंतरच कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती.
मात्र, आयआयटी रावचा युक्तिवाद फेटाळत ग्राहक मंचाने म्हटले की, दोन वर्षांची फी भरूनही तक्रारदाराच्या मुलाने अवघ्या तीन महिन्यांत क्लास सोडला, याचाच अर्थ क्लासेस चांगली शिकवणी देण्यास अपयशी ठरले आहे.
आयआयटी रावने कर्तव्यात
कसूर केली आहे, असे म्हणत ग्राहक मंचाने त्यांना विद्यार्थ्याला ८५ हजार रुपयांचा परतावा व मानसिक त्रासापोटी पाच हजार रुपये देण्याचा आदेश दिला.
>पालकांनी केली होती फी परत करण्याची विनंती
मेरज रसूल खान यांनी क्लासेच्या फीची रक्कम परत करण्याची विनंती केली. क्लासेसने दिलेले साहित्य, कर आणि तीन महिन्यांचे शिकवणी शुल्क कापून फीची उर्वरित रक्कम द्यावी, असा पत्रव्यवहारही खान यांनी क्लासेसकडे केला. मात्र, फीची रक्कम परत करण्याचे धोरण क्लासचे नाही, असे म्हणत आयआयटी रावने खान यांना फी परत करण्यास नकार दिला.