"९० हजार एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप पगार नाही; कुठे गेले सदावर्ते-पडळकर?"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 12:52 PM2023-01-13T12:52:51+5:302023-01-13T13:04:42+5:30
आता राष्ट्रवादी काँग्रेसने गोपीचंद पडळकर आणि गुणरत्न सदावर्तेंना प्रश्न विचारला आहे.
मुंबई - राज्यातील एसटी कामगारांच्या पगारावरुन आता विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार काळात एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी मोठा संप केला होता. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी या संपात सहभाग घेत मागण्यांसाठी महाविकास आघाडीला धारेवर धरले होते. त्यामुळे, आता राष्ट्रवादी काँग्रेसनेगोपीचंद पडळकर आणि गुणरत्न सदावर्तेंना प्रश्न विचारला आहे.
जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही आता गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचा कळवळा आला नाही का? आता कुठे आहेत हे दोघे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. राज्यातील ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार अद्याप झालेला नाही. महाविकास आघाडी सरकार असताना या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहिन्याला ३६० कोटी रुपयांची तरतूद राज्यसरकारच्या कोषातून केली जात होती. आता सहा महिन्यापासून शिंदे - फडणवीस सरकार आले आहे तरीदेखील कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नाही हे दुर्दैव आहे असेही महेश तपासे म्हणाले.
भाजपप्रणीत सरकार आले तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे तेच पगाराचे ओझे आहे त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचे मसिहा बनण्याचा प्रयत्न करणारे सदावर्ते आणि पडळकर काय भूमिका घेणार हे आता त्यांनी जनतेसमोर जाहीर करावे, असे आवाहनही तपासे यांनी केले आहे.
सदाभाऊ खोत यांनी दिला इशारा
महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरवणीवर आला आहे. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे होते, त्या पद्धतीने सरकार याकडे पाहत नाही. महिन्याच्या महिन्याला कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करुन बैठक घ्यायला हवी. अन्यथा आम्हाला लढा दिल्या शिवाय पर्याय नाही, असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.