Join us

९०० बॅटऱ्या लांबवल्या अवघ्या दहा महिन्यांत; ‘बेस्ट’च्या ई-दुचाकींना बॅटरी चोरीचा शॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 8:40 AM

ई-दुचाकीच्या तब्बल ९०० बॅटऱ्या चोरण्याचा प्रताप प्रशासन आणि दुचाकी पुरवणाऱ्या कंपनीला शॉक देणारा ठरला आहे.

रवींद्र राऊळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  ई-दुचाकीच्या तब्बल ९०० बॅटऱ्या चोरण्याचा प्रताप प्रशासन आणि दुचाकी पुरवणाऱ्या कंपनीला शॉक देणारा ठरला आहे. कुठेही पार्क करून ठेवलेल्या दुचाकी आधुनिक तंत्रामुळे शोधता येतात; पण चोरीला गेलेल्या बॅटऱ्या कशा शोधायच्या, हे नवे आव्हान बेस्टने करार केलेल्या कंपनीपुढे उभे ठाकले आहे. प्रकरण पोलिसांत गेले आणि दादर पोलिसांनी दोन चोरांना अटक करून दहा बॅटऱ्या जप्त केल्या आहेत.

बेस्टने वोगो आटोमेटिव्ह प्रा.लि.शी करार केला असून, ही कंपनी बेस्टच्या उपक्रमासाठी या दुचाकी पुरवते. शहरातील वेगवेगळ्या भागांत अशा पाचशे ई- दुचाकी तैनात करण्यात आल्या आहेत; मात्र गेल्या वर्षभरात पार्क केलेल्या  ई-दुचाकींमधील बॅटऱ्या सतत चोरीला जाऊ लागल्या. कंपनीने बॅटऱ्या बदलल्या की पुन्हा त्यांची चोरी होत आहे. दुचाकींमध्ये जीपीएस आणि आयओटी प्रणाली बसविण्यात आल्याने दुचाकींचा ठावठिकाणा कंपनीला समजू शकतो. हे पाहून पार्क केलेल्या दुचाकींच्या बॅटऱ्या लंपास करणे सुरू झाले आहे.

बॅटरीची किंमत सुमारे वीस हजार

दादर, प्रभादेवी, आदर्शनगर, वरळी कोळीवाडा या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी पार्क केलेल्या या ई-दुचाकींमधून इलेक्ट्रिक बॅटऱ्या चोरीस गेल्याचे कंपनीचे वरिष्ठ लायझनिंग एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सुशांत सावंत यांच्या निदर्शनास आले.  दादर पोलिसांनी मोहसीन शेख आणि रिझवान इक्बाल शेख या दोन बॅटरी चोरांना अटक केली. तपासात त्यांनी चोरलेल्या बॅटरी गोराई येथे विकल्याचे उघड झाले. पोलिसांनी या दहा बॅटरी जप्त केल्या. एका नव्या इलेक्ट्रिक बॅटरीची किंमत सुमारे वीस हजार रुपये आहे. चोरी केल्यानंतर आरोपी या बॅटरी मॉडीफाय आणि असेम्बल्ड करून विकत असल्याचे चौकशीत आढळले आहे.

- कंपनी अधिकाऱ्यांनी जीपीएस स्टिस्टीमचा आधार घेत काही बॅटरी चोरांकडून हस्तगत केल्या. - कामाठीपुरासारख्या काही ठिकाणी तर लहान मुलेही बॅटरी चोरत असल्याचे आढळले. - कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या पालकांनी त्या बॅटरी कंपनीला परत केल्या.- वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल या भागांत हे प्रमाण अधिक.- कंपनीने वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत तक्रारी केल्या. - काही पोलिस ठाण्यांत तक्रारीच नोंदवून घेण्यात अडथळे.- वांद्रे, बोरीवली, अंधेरी या भागांत हे बॅटरी चोरीचे प्रमाण अधिक.

पोलिसांचे म्हणणे...

काही ठिकाणी बॅटरी चोरत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सापडले. पण शहरातील निम्मे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने बहुतेक आरोपी सीसीटीव्हीत कैद होऊ शकले नाहीत. अनेकदा फुटेज अतिशय अस्पष्ट असल्याने आरोपींचे चेहरे; तसेच त्यांच्या वाहनांचे क्रमांक सापडू शकले नाहीत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

टॅग्स :बेस्टइलेक्ट्रिक कार / स्कूटर