टोल वसुली कंत्राटदाराला ९०० कोटींची भरपाई? मुदतीपूर्वीच टोलसूट दिल्याने आर्थिक भार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 02:50 PM2024-10-15T14:50:10+5:302024-10-15T14:50:10+5:30

मुदतीपूर्वीच या टोल नाक्यांवरून कार, स्कूल बस आणि एसटी महामंडळाच्या बसला टोलसूट दिल्याने कंत्राटदाराला भरपाईपोटी तब्बल ८०० ते ९०० कोटी रुपये एमएसआरडीसीला द्यावे लागतील, अशी शक्यता या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

900 crore compensation to toll collection contractor? Financial burden due to early payment of toll exemption  | टोल वसुली कंत्राटदाराला ९०० कोटींची भरपाई? मुदतीपूर्वीच टोलसूट दिल्याने आर्थिक भार 

टोल वसुली कंत्राटदाराला ९०० कोटींची भरपाई? मुदतीपूर्वीच टोलसूट दिल्याने आर्थिक भार 

मुंबई : टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना सूट देण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला टोल वसुली करणाऱ्या कंत्राटदारास आता जवळपास ८०० ते ९०० कोटी रुपये द्यावे लागण्याची शक्यता असल्याची माहिती एमएसआरडीसीमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

मुंबईच्या प्रवेशद्वारावरील दहिसर, ऐरोली, वाशी, मुलुंड आणि एलबीएस रस्त्यावरील टोल नाक्यांवरून सप्टेंबर २०२७ पर्यंत टोल वसुली करण्याची परवानगी एमएसआरडीसीला दिली होती. त्यानुसार एमएसआरडीसीने २०१० मध्ये एमईपी इन्फ्रास्ट्रक्चरला नोव्हेंबर २०२६ पर्यंत टोल वसुली कंत्राट दिले होते. या कंत्राटासाठी कंपनीने २१०० कोटी रुपये मोजले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, आता मुदतीपूर्वीच या टोल नाक्यांवरून कार, स्कूल बस आणि एसटी महामंडळाच्या बसला टोलसूट दिल्याने कंत्राटदाराला भरपाईपोटी तब्बल ८०० ते ९०० कोटी रुपये एमएसआरडीसीला द्यावे लागतील, अशी शक्यता या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

३३०० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी
या मार्गावर वाशी खाडीपुलावर नव्याने पुलांची उभारणी करण्यात आली आहे. त्याचा खर्च भागविण्यासाठी एमएसआरडीसीला २०३६ पर्यंत वाशी खाडीपुलावरील टोल नाक्यावरून टोल वसुलीची मुभा होती. मात्र, नव्या निर्णयाने एमएसआरडीसीचा उत्पन्नाचा स्रोत कमी होणार आहे. त्यातून एमएसआरडीसीला भविष्यातील सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागेल, असेही सूत्रांनी सांगितले.

दरमहा ४२ कोटी टोल
या पाच टोलनाक्यांवरून दरमहा साधारणपणे ६० लाख वाहने प्रवास करत होती. यामध्ये ऑगस्ट २०२४ मधील आकडेवारीनुसार एका महिन्यात या पाच टोलनाक्यांवरून ६१ लाख ९३ हजार वाहनांनी प्रवास केला. त्यातून तब्बल ४२ कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न कंत्राटदाराला मिळाले. यामध्ये ४२ लाख ६१ हजार कारचा समावेश होता. या कार चालकांकडून २२ कोटी ५५ लाख  उत्पन्न कंत्राटदाराला मिळाले होते.


 

Web Title: 900 crore compensation to toll collection contractor? Financial burden due to early payment of toll exemption 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.