लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २०२१च्या मार्च महिन्यात राज्यात घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे राज्याच्या तिजोरीत ९ हजार ६६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
मागील वर्षी कोरोनाने थैमान घातले होते. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी झळ बसली. याला पुन्हा चालना मिळावी यासाठी शासनाने मुद्रांक शुल्क नोंदणीमध्ये तीन टक्के सवलत दिली. सप्टेंबर ते डिसेंबर ३ टक्के व जानेवारी ते मार्च २ टक्के अशा स्वरूपात ही सवलत दिली होती. मार्च महिना हा मुद्रांक शुल्क सवलतीचा शेवटचा महिना असल्याने अनेकांनी याचा लाभ घेतला. त्यामुळे मार्च महिन्यात राज्यात घर खरेदीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या घर खरेदीमुळे शासनाच्या तिजोरीत महसूलदेखील चांगला जमा झाला.
२०२० या संपूर्ण वर्षात ११ हजार कोटी रुपये महसूल राज्याला मिळाला. २०२०च्या डिसेंबर महिन्यात सर्वात जास्त म्हणजेच २ हजार २१३ कोटी रुपये महसूल जमा झाला. परंतु यंदाच्या एकट्या मार्च महिन्यात राज्याच्या तिजोरीत ९ हजार कोटी रुपये महसूल जमा झाला.
मागील आठ वर्षातील राज्यातील मार्च महिन्यातील घर खरेदी व त्यातून मिळालेला महसूल महिना-वर्ष / झालेली घर खरेदी / मिळालेला महसूल
मार्च २०१३ / १४०३५९ / १ हजार ४२६ कोटी
मार्च २०१४ / १२०७४८ / १ हजार ६९ कोटी
मार्च २०१५ / ११७४४३ / १ हजार २२२ कोटी
मार्च २०१६ / १२६७६६ / १ हजार ४७५ कोटी
मार्च २०१७ / १२५५७६ / १ हजार ५४६ कोटी
मार्च २०१८ / १३८६५० / २ हजार ३८ कोटी
मार्च २०१९ / १२७४४५ / १ हजार ८६८ कोटी
मार्च २०२० / ८५०६८ / १ हजार १०३ कोटी
मार्च २०२१ / २१३४१३ / ९ हजार ६६ कोटी
........................................