मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू आहे. रविवारी ५,७५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ९,००० नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १८० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ५९,८०,३५० कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२४ टक्के झाले आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.०४ टक्के इतका आहे. आता राज्यात १ लाख ३ हजार ४८६ रुग्ण सक्रिय आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५४,८१,२५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,१४,१९० (१३.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६७,५८५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर ४,०६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी तिसऱ्या लाटेची धास्ती सतावत आहे. करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका पाहता प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे सरकारने अद्यापही सर्व निर्बंध शिथिल केलेले नाहीत. दुसऱ्या लाटेतून धडा घेतल्याने सरकार काळजीपूर्वक निर्णय घेत आहे.