मुंबईत ३ तासांत ९ हजार वाहनांची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:05 AM2021-03-30T04:05:52+5:302021-03-30T04:05:52+5:30
ऑपरेशन ऑल आउट : विविध २०८ ठिकाणी नाकाबंदी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत होळी आणि धुळवडीच्या निमित्ताने करण्यात ...
ऑपरेशन ऑल आउट : विविध २०८ ठिकाणी नाकाबंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत होळी आणि धुळवडीच्या निमित्ताने करण्यात आलेल्या ऑल आउट ऑपरेशनअंतर्गत तीन तासांत २०८ ठिकाणी नाकाबंदी करत, ९ हजार ३०० वाहनांची झाडाझडती घेण्यात आली.
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. यात, पाचही प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त, १२ परिमंडळाचे पोलीस उपायुक्त आणि सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत रविवारी रात्री ११ ते मध्यरात्री २ पर्यंत हे ऑपरेशन सुरू होते. या दरम्यान मुंबईत २०८ ठिकाणी नाकाबंदी करत, ९ हजार ३६२ वाहनांची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये २ हजार १५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात ड्रंक अँड ड्राइव्ह अंतर्गत ४२ वाहनांचा समावेश आहे.
दुसरीकडे २५५ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यामध्ये अभिलेखावरील ५०३ आरोपी मिळून आले, तर ३१ पाहिजे व फरारी आरोपींना अटक करण्यात आली आहे. ड्रग्स विरोधात अमली पदार्थ विरोधी पथकाने ९३ जणांवर कारवाई केली. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या एकूण ३२ जणांवर कारवाई करून शस्त्रे जप्त करण्यात आली आहे, तसेच ८९७ हॉटेल, लॉज, मुसाफिर खान्याची झाडाझडती करण्यात आली, तसेच अवैध धंद्यावर ५३ ठिकाणी छापे टाकून ७० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यात आली आहे.