थर्टी फर्स्टला भिरभिरणाऱ्या ९०२५ वाहनांची झाडाझडती! मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त, २४१० विनाहेल्मेट चालकांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 01:29 PM2024-01-02T13:29:43+5:302024-01-02T13:30:08+5:30
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषाने स्वागत करण्यासाठी मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई : मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे नववर्ष स्वागताची पूर्व संध्या जल्लोषात पार पडली. यादरम्यान मुंबई पोलिसांनी ९०२५ वाहनांची झाडाझडती घेत २४०१ विनाहेल्मेट चालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईत २२९ तळीरामांचे सेलिब्रेशन पोलिस कोठडीत झाले.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषाने स्वागत करण्यासाठी मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये चोख बंदोबस्त नेमण्यात आला होता. पोलिस आयुक्त विवेक फणसळकर व विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती व पोलिस सहआयुक्त (का. व सु.) सत्यनारायण चौधरी यांनी शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले. शहरातील सर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त विशेष शाखा, अपर पोलिस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, २२ पोलिस उपायुक्त, ४५ सहायक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ४५० पोलिस निरीक्षक, १६०१ इतर अधिकारी व ११५०० पोलिस अंमलदार यांनी एकत्रित सर्व मुंबई शहरात नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला चोख बंदोबस्त करून कुठलाही अनुचित प्रकार होऊ दिला नाही.
२८३ तळीरामांना पकडले
- नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडलेल्या २८३ तळीरामांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. दारू प्राशन करून वाहन चालवू नये असे आवाहन मुंबई पोलिसांकडून सातत्याने करण्यात येत होते.
- मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून ड्रिंक अँड ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न अनेकांनी
केला. त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली.
- मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणात वाढ झाली. मागील वर्षी जवळपास १५६ जणांवर कारवाई करण्यात आली होती.
कठोर तपासणी
- बंदोबस्तादरम्यान सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११२ ठिकाणी विशेष नाकाबंदी करत ९०२५ दुचाकी/तीनचाकी, चार चाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली.
- या तपासणीदरम्यान विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्या एकूण २४१०, विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या एकूण ३२० व बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या एकूण ८० वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
- तसेच मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या एकूण २८३ मद्यपी वाहनचालकांवर कलम १८५ मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने मर्मस्थळे व संवेदनशील ठिकाणे अशा एकूण ६१८ ठिकाणी तपासणी करण्यात आली.
- सार्वजनिक ठिकाणे, गर्दीचे ठिकाणे, समुद्र किनारे व विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता.