Join us

९१ टक्के ज्येष्ठांनी केले ‘घरूनच मतदान’; पहिल्यांदाच राबविण्यात आला उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 7:29 AM

शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले, ८० किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत ४३० मतदारांनी या पर्यायास तयारी दर्शवली होती.

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक गुरुवारी झाली. या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या निवडणूक इतिहासात ‘घरून मतदान’ हा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला. शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले, ८० किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत ४३० मतदारांनी या पर्यायास तयारी दर्शवली होती. त्यापैकी ३९२ मतदारांनी म्हणजेच ९१ टक्के मतदारांनी घरूनच मतदान केले, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी  निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान अंधेरी पूर्व मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले सात जणांचे पथक या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी गेले. घरी पोहोचल्यानंतर या पथकाकडून तात्पुरते मतदान केंद्र उभारण्यात आले. घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्तीने नाव नोंदविले त्या व्यक्तीने आपले मत हे गुप्त मतदान पद्धतीने नोंदविले. 

टॅग्स :निवडणूकमुंबई