Join us

झाडाची फांदी डोक्यावर पडून 91 वर्षीय वृद्धेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 11:46 AM

झाडं पडून लोकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना मुंबईत पाहायला मिळत आहेत. 

मुंबई- पावसाळा तोंडावर असताना मुंबई महापालिकेकडून लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी नालेसफाई, रस्तेदुरूस्ती, वाढलेल्या व धोकादायक झाडाची तोडणी अशी सगळी काम केली जात असल्याचं सांगितलं जात आहे. असं असतानाही झाडं पडून लोकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना मुंबईत पाहायला मिळत आहेत. 

झाडाची फांदी डोक्यावर पडून एका 91 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी वाळकेश्वरमध्ये घडली. बाणगंगा तलावाच्या परिसरात झाडाची फांदी अंगावर पडून ९१ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुखी लीलाजी असं मृत महिलेचं नाव आहे. 

सुखी लीलाजी फेरफटका मारण्यासाठी बाणगंगा तलावाजवळ गेल्या होत्या. त्यावेळी एका झाडाची फांदी त्यांच्यावर कोसळली. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना उपचारांसाठी गोकुळदास तेजपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. वृद्ध महिलेच्या डोक्याला दुखापत झाली तसंच त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. पण डोक्यामध्ये झालेल्या दुखापती व रक्तस्त्रावामुळे महिलेचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. 

झाडं पडून नागरिकांचा मृत्यू होत असल्याच्या घटनांमध्ये मुंबईत वाढ होते आहे. अपघातांचं प्रमाण कमी आहे असा दावा बीएमसी करत असलं तरी अपघातांची संख्या कमी नाही. यंदा पावसाच्या आधीच  घटना घडल्यामुळं शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. झाड अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना याआधीही घडली आहे. दूरदर्शन वाहिनीची माजी अँकर कांचन नाथ (वय 58) यांचा नारळाचं झाड अंगावर पडून मृत्यू झाला होता. कांचन नाथ मॉर्निंग वॉकला जात असताना घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.